रमाकांत कोंडुस्कर यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : सीमाभागात खितपत पडलेल्या मराठी भाषिकांना न्याय द्या, अशी मागणी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वेदना सांगण्यात आल्या. मराठी भाषिकांना आरोग्य तसेच इतर सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. बुधवारी सीमाप्रश्नासाठी नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर म. ए. समितीच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बेळगावसह संपूर्ण सीमाभागात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, मंगेश चिवटे, प्रा. आनंद आपटेकर, अनंत पाटील, अमित जाधव, शिवराज सावंत यांसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









