विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : कर्नाटक हडपद विकास महामंडळाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांच्या शालेय नेंदणीतील दुरुस्ती करा, विधानपरिषदेवर समाजाला प्राधान्य द्या, गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय आणि वसतिगृह सुरू करा, आदी मागण्यांसाठी अखिल कर्नाटक हडपद अप्पण्णा समाज सेवा संघातर्फे मंगळवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले.
हडपद समाजाच्या कल्याणासाठी विकास महामंडळाची स्थापना करावी, या अंतर्गत समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न व्हावा, समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृह स्थापन करावीत, विशेषत: जिल्हा आणि तालुका स्तरावर ही वसतिगृहे उपलब्ध करावीत, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
समाजातील विद्यार्थ्यांच्या शालेय नेंदीमध्ये चुकीच्या जातीची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी येऊ लागल्या आहेत. शालेय नोंदीमधील चुकीच्या जातीमध्ये दुरुस्ती व्हावी, मागील अनेक वर्षांपासून हडपद समाजातर्फे विविध मागण्यांसाठी लढा सुरू आहे. मात्र, अद्याप न्याय मिळालेला नाही, त्यामुळे समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता करून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.









