संघटनेची कामगार आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : घरेलू महिला कामगारांना समाजात सन्मान मिळावा, शासन व घरमालकाकडून विविध सुविधा मिळाव्यात, याबाबत येथील कामगार आयुक्त यांना घर कामगार महिला संघटनेतर्फे सोमवारी निवेदन देण्यात आले. मजगाव येथील कामगार आयुक्तालयात जाऊन साहाय्यक कामगार आयुक्त देवराज यांना विविध मागण्यांबाबत निवेदन सादर केले. 2011 साली राज्य शासनाने घर कामगार महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने नियमावली केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी करावी, आठवड्यातून एक दिवस सुटी लागू करावी, कामाच्या ठिकाणी जातीभेद करू नये, घर कामगार महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना आखाव्यात, साठ वर्षापुढील महिला कामगारांना सहाय्यधन देण्याची व्यवस्था करावी, सण उत्सवानिमित्त सुटी मिळावी, या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. कामगार अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून सर्व महिला कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वैशाली कम्मार, दिल्ली येथील बाल विकास धारा संस्थेच्या प्रतिनिधी शोभा किणगी, यल्लू काकतकर, बेळगाव घरकामगार महिला कमिटीच्या अध्यक्षा रत्ना सत्यानगोळ, उपाध्यक्ष सुनीता कदम, मंगल घाटगे, रेखा कांबळे यांच्यासह शेकडो घर कामगार महिला उपस्थित होत्या.









