जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
बेळगाव ; जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अमलीपदार्थांची वाहतूक व विक्री थोपविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. तरीही अमलीपदार्थांची विक्री दिसून आली तर नागरिकांनी त्वरित सरकारी यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अमलीपदार्थांची वाहतूक व विक्री थोपविण्यासाठीच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कोणत्याही प्रकारच्या अमलीपदार्थांचा साठा करणे, त्याची वाहतूक करणे आदी विषयी नागरिकांनी माहिती द्यावी. तसेच शाळा, कॉलेजजवळ अमली पदार्थ विकणाऱ्यांवर नजर ठेवण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
काही ठिकाणी शेतजमिनीत गांजा लागवड केली जाते. अशा प्रकरणात नागरिकांनी स्थानिक पोलीस व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत अमलीपदार्थांचा वापर होवू देणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीत नूतन जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद म्हणाले, राजधानी बेंगळूरमध्ये अमलीपदार्थांची विक्री वाढली आहे. तेथे ते रोखण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगावातही खबरदारी घेण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत आमदार राजू सेठ, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, कष्टम्स् विभागाचे श्रीकांत, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला आदी उपस्थित होते.









