विधानसौध परिसरात कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
बेळगाव : राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसतीशाळेतील कर्मचाऱ्यांना मासिक किमान 31 हजार वेतन द्या, महसूल खात्याकडून थेट वेतन अदा करा, कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करा, दरमहा निश्चित तारखेला वेतन द्या, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लागू करा, विविध वसतिगृहांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान वेतन लागू करा आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसतीशाळा कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात राज्यातील विविध सरकारी हॉस्टेल आणि वसतीशाळेतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यातील विविध सरकारी हॉस्टेल आणि वसतीशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कर्मचाऱ्यांना दरमहा 31 हजार रुपये वेतन द्यावे, यासह हे वेतन थेट महसूल खात्याकडूनच अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबर कर्मचाऱ्यांच्या अधिक सुरक्षिततेसाठी सेवानिवृत्तीनंतर सेवा सुरक्षा प्रदान करा. वाढती महागाई लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा वेळेत द्या, अशी मागणीही आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
विविध हॉस्टेल आणि वसतीशाळांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढू लागला आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, त्याबरोबर राज्यातील काही वसतिगृहांमध्ये स्वयंपाकघरात विविध साहित्य पुरविण्यात आले आहे. मात्र, काही वसतिगृहांमध्ये साहित्यांअभावी कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्यामुळे वसतिगृहांमध्ये योग्य त्या सुविधांबरोबर साहित्य पुरवा, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.









