खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत : नजरा भरपाईकडे
बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या पथकाने केवळ चार तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा केला आहे. मात्र, सर्वच तालुक्यावर दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून वाढीव रकमेची एकमुखी मागणी होऊ लागली आहे. केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता भरीव नुकसानभरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. यंदा जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी आणि लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2.5 लाख हेक्टर क्षेत्रातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. पावसाअभावी भात, ऊस, भुईमूग, सोयाबीन, मका आणि बागायती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादनासाठी ट्रॅक्टर भाडे, रासायनिक खते, मजुरी, किटकनाशके आदींवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र हा खर्चदेखील पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न पडला आहे. जिल्ह्यातील सर्वच पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी. एनडीआरएफच्या नियमानुसार बागायती क्षेत्रासाठी आणि पावसावर अवलंबून असलेल्या पिकांसाठी भरपाई मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीसाठी खर्च केलेल्या रकमेएवढी भरपाई मिळावी, अशी मागणीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे
दुष्काळाचा अभ्यास दौरा झाला, भरपाई कधी?
जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि केंद्राच्या पथकाकडून दुष्काळी भागाचा दौरा करून पाहणी करण्यात आली आहे. सदर अहवाल राज्य सरकारकडे पाठविला आहे. मात्र, आता मदत कधी मिळणार? असा प्रश्नही शेतकऱ्यांतून विचारला जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र पथकाने केवळ चार तालुक्यांची पाहणी केली आहे. मात्र सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाअभावी रब्बी हंगामदेखील धोक्यात
यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. आता परतीच्या पावसाने देखील पाठ फिरवली आहे. त्यामुळे रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बळीराजावर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. खरीप वाया गेला त्यामुळे रब्बीवर आशा होत्या. मात्र आता रब्बी हंगामदेखील पावसाअभावी धोक्यात येऊ लागला आहे.









