बेळगाव शेतकरी संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन : बळ्ळारी-लेंडी नाल्यामुळे मोठे नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. हा नाला खोदाई करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे महापालिका व प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱयांना एकरी 1 लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे केली आहे.
बळ्ळारी व लेंडी नाला स्वच्छ करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. या नाल्यामध्ये उगवलेले गवत तसेच इतर कचरा काढल्यास नुकसान निश्चितच होणार नाही. याचबरोबर शहरालाही पुराचा धोका बसणार नाही. जुन्या पी. बी. रोडपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत लेंडी नाला स्वच्छ केल्यास शहराला पूर येणार नाही. येळ्ळूर रस्त्यापासून बळ्ळारी नाला उगम पावला असून तेथून हुदलीपर्यंत नाल्याची खोदाई झाली पाहिजे, असे नारायण सावंत यांनी यावेळी पालकमंत्र्यांना सांगितले.
मुचंडीजवळ खडकाळ जागा आहे. त्याठिकाणी पाणी निचरा होत नाही. तो खडक फोडून पाणी पुढे सोडल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. नाल्याची खोदाई झाली तर शिवाराला पूर येणार नाही. याचबरोबर हे पाणी इतर जलाशयांमध्ये नेऊन साठा करणे शक्मय आहे. तेव्हा याबाबत विचार करून तातडीने या नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुनील जाधव, जोतिबा दौलतकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
कचरा काढण्याच्या
आधुनिक यंत्राची दखल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी नाल्यातील कचरा काढण्याचे नवीन आधुनिक यंत्र जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना दाखविले. त्यांनी तातडीने त्याची दखल घेऊन महापालिकेच्या अधिकाऱयांना या यंत्राबाबत संपूर्ण माहिती घ्या, अशी सूचना केली आहे.









