महापालिका आयुक्तांना सफाई कर्मचाऱ्यांचे निवेदन
बेळगाव : सफाई कर्मचाऱ्यांना तातडीने क्वॉर्टर्स तसेच घरे द्यावीत. पेन्शनमधून घरभाडे कपात करू नये. 386 मैलावाहू कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ओळखपत्र द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी सफाई कर्मचारी समितीच्यावतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. अध्यक्ष दीपक वाघेला यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी 2008 साली क्वॉर्टर्स व घरे मंजूर झाली आहेत. मात्र अद्याप त्यांना घरे तसेच क्वॉर्टर्स देण्यात आली नाहीत. शहापूर, रुक्मिणीनगर, माळमारुती येथे घरे तसेच जागा देण्यात येणार आहे. मात्र अद्याप त्याची पुर्तता करण्यात आली नाही. तेंव्हा संबंधितांना घरे द्यावीत, असे या निवेदनात म्हटले आहे.
शहरामध्ये एकूण 386 मैलावाहू कर्मचारी होते. त्यांच्या कुटुंबीयांना ओळखपत्रे देणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी आम्ही करत आहोत. मात्र अजूनही त्यांना ओळखपत्रे दिली गेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये शहापूर येथील रमाबाई आंबेडकर समुदाय भवन येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी व्यायामशाळा, याचबरोबर ग्रंथालय सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. त्याची कार्यवाही देखील तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष मुनीस्वामी भंडार, विजय नरगट्टी, शन्मुख अदियंद्र, मालती सक्सेना, अरुणा साके, सुनिल बनसे, राजेश बनस, शेखर शबरी, प्रितम बनस, राजन वाघेला, राममोहन साके, कुमार हरिजन आदी उपस्थित होते.









