सर्वोच्च न्यायालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वत:च्या आदेशाच्या पालनाकरता वृत्तपत्रांमध्ये जारी करण्यात आलेल्या जाहिरातींचा तपशील सादर करण्याचा निर्देश दिला आहे. ‘घड्याळ’ या चिन्हाच्या वाटपाचे प्रकरण न्यायालयासमोर विचाराधीन असल्याचे नमूद असणारी जाहिरात प्रसारित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या गटाला दिला होता.
न्यायालयाच्या 19 मार्चच्या आदेशाचे अजित पवार गटाने पालन केला नसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर न्यायाधीश सूर्यकांत आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाचे वकील मुकुल रोहतगी यांना जारी करण्यात आलेल्या जाहिरातींचा तपशील सादर करण्यास सांगितले आहे.
संबंधित आदेशानंतर किती जाहिराती जारी करण्यात आल्या याचा तपशील सादर करा. कुणालाही जाणूनबुजून आमच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढण्याचा अधिकार नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.









