जिल्हापालक सचिव विपुल बन्सल यांची सूचना : जिल्ह्यातील विविध खात्यांची विकास आढावा बैठक
बेळगाव : जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची अंमलबजावणी, शाळा विद्यार्थ्यांना अंडी, केळ्याचे वितरण, शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेणे, जनावरांची गणती यांसह सरकारच्या प्रत्येक योजना, कार्यक्रम, अंमलबजावणीनंतर त्याचे साधक-बाधक परिणाम, त्याचबरोबर नव्या योजनाबाबत संबंधित खात्याच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हापालक सचिव तथा प्राप्तिकर खात्याचे आयुक्त विपुल बन्सल यांनी केले. येथील स्मार्टसिटीच्या कार्यालयात मंगळवार दि. 11 रोजी झालेल्या जिल्ह्यातील विविध खात्यांच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बन्सल बोलत होते.
जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना राबविलेल्या स्थळांवर सर्वांना पिण्याचे पाणी मुबलक मिळत नाही, अशा तक्रारी असून याची अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. त्याचबरोबर ही योजना राबविल्यानंतर नागरिक पाण्याचा वापर कशाप्रकारे करतात याची माहिती घ्यावी. उन्हाळा जवळ आला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याची दखल घेत पूर्वनियोजन करण्यात यावे. पावसाळ्यात डासांपासून होणाऱ्या डेंग्यूसारख्या आजाराला आळा घालण्यासाठी आतापासूनच कृती योजना तयार करण्यात यावी. सरकारी रुग्णालयात बाळंतीणींची मृत्यू प्रकरणे वाढली असून याची कारणे शोधून बाळतींणींचा मृत्यू रोखण्यासाठी उपक्रम राबवावेत, अशी सूचना बन्सल यांनी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
महापालिका हद्दीतील कचऱ्याची उचल व विल्हेवाट होत असल्याची खातरजमा करून घ्यावी. आवश्यकता भासल्यास आणखी एका कचरा डेपोसाठी जागा खरेदी करण्यात यावी. जिल्ह्यातील सरकारी इंग्लीश माध्यम शाळांमधून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा तपासून घ्यावा. तसेच पालकवर्गाच्या इच्छेनुसार शाळांतून प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारच्या मार्गसूचीनुसार विद्यार्थ्यांना अंडी, केळी, चिक्कीचे वितरण करण्यात यावे. समाजकल्याण, मागासवर्ग कल्याण, अल्पसंख्याक कल्याण खात्यांच्या वसतिगृहांच्या जागा संबंधित खात्याच्या नावावरच असाव्यात याची दखल घ्यावी.
जिल्हा आरोग्य-कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद म्हणाले, सरकारी रुग्णालयातून सेवा बजावत असलेले डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवून त्यांच्याकडून रुग्णांना उत्तम सेवा देण्यात येत आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, महापालिका आयुक्त शुभा बी., स्मार्टसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सईदा बळ्ळारी, जि. पं. उपसचिव बसवराज हेगनायक, समाजकल्याण खात्याचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळी, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, आहार खात्याचे उपसंचालक मंजुनाथ नायक यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.









