मुस्लीम संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : आरपीएफ जवानाने रेल्वे प्रवासादरम्यान चार व्यक्तींची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. यामध्ये मुस्लीम व इतर मागास जातीच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा हा एक प्रयत्न होता. यामध्ये चार निष्पापांचा बळी गेला असून आरोपी चेतनसिंहला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बेळगावमधील ऑल मुस्लीम फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. जयपूर-मुंबई सेंट्रल एक्सप्रेसमध्ये चेतनसिंह या आरपीएफ जवानाने मुस्लीम प्रवाशांवर त्यांचे नाव विचारुन गोळ्या झाडल्या होत्या. हा प्रकार देशाच्या एकतेला धोका पोहोचविणारा आहे. देशात एकीकडे महिलांचे शोषण, अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र जगभर दौरा करत आहेत. परंतु त्यांनी देशातील एकता नांदावी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. आरोपी चेतनसिंह याने मुस्लीम धर्मियांना वेठीस धरले व बेछूट गोळीबार केला. देशात मुस्लीम धर्माविषयी द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मुस्लीम संघटनांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकरवी राष्ट्रपतींना पाठविले आहे.









