दलित संघटनांची खानापूर तहसीलदारांकडे मागणी
खानापूर : उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील एका अनुसूचित जातीच्या पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका दलित संघटनांच्यावतीने खानापूर तहसीलदाराना देण्यात आले. तसेच निदर्शनेही करण्यात आली. यल्लापूर तालुक्यातील मदनूर ग्राम पंचायत क्षेत्रातील पहिलीत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनीवर हल्याळ तालुक्यातील असलम आदमसाब सतार यांने बळजबरीसारखे कृत्य केले आहे. या कृत्याचा खानापूर तालुक्यातील दलित संघटनातर्फे तीव निषेध करत आहे.
या नराधम आरोपीला कायद्याच्या चौकटीतून कठोर शिक्षा, मृत्युदंड देण्यात यावा. या शिक्षेमुळे भविष्यात अशा कृत्याना आळा बसेल. तसेच जिच्यावर अत्याचार झाला आहे. ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत करावी, अशी निवेदनात मागणी केली आहे. यावेळी विश्वनाथ नागनूर, कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती समन्वयक, जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडलगी, तालुकाध्यक्ष राघवेंद्र चलवादी, अखंड कर्नाटक राज्य रयत संघाचे तालुका अध्यक्ष अखिलसाब मुनवळी, भीमसेना तालुकाध्यक्ष रोहित पोळ, दयानंद राजपूत हक्की पिक्की संघटना, प्रणेश तलवार, दलित युवा संघटनेचे अध्यक्ष मारुती तलवार तालुका उपाध्यक्ष आकाश तलवार, अध्यक्ष रवी मादार, तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.









