क्रेडाईची अग्निशमन विभागाकडे मागणी
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेमध्ये अग्निशमन सेवांसाठी इमारतींची उंची 21 मीटर ठरवण्यात आली आहे. परंतु, उंची ठरवताना जुनाच सेटबॅक लागू करावा. त्यामुळे इमारत बांधकाम करताना सोयीचे ठरेल, अशी मागणी क्रेडाई बेळगावच्यावतीने अग्निशमन विभागाला निवेदनाद्वारे करण्यात आली. यापूर्वी बेळगावसारख्या शहरात 15 मीटरपर्यंत इमारतींच्या उंचीला मर्यादा होती. ती मर्यादा आता 21 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कमी उंचीच्या इमारतींना अग्निशमन दलाच्या वाहनांना प्रवेशाची आवश्यकता नाही. कारण इमारतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यांवरून इमारतींमधील आग विझविण्याची नवीन यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यामुळे सेटबॅक 15 मीटरपर्यंत मर्यादित न ठेवता तो देखील 21 मीटरपर्यंत वाढवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी क्रेडाईचे म्हणणे ऐकून घेत याबाबत आपण बेंगळूर येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी, सेक्रेटरी प्रशांत वांडकर, खजिनदार सुधीर पानारे, संचालक राजेश माळी, सचिन बैलवाड यासह इतर सदस्य उपस्थित होते.









