भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपालकृष्ण अग्रवाल यांचे आवाहन
बेळगाव : देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून त्यात कर्नाटकचा वाटा मोठा आहे. ही अर्थव्यवस्था आणखी उत्तम करण्यासाठी राज्य भाजप सरकारला निवडणुकीत आणखी एक संधी द्यायला हवी, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपालकृष्ण अग्रवाल यांनी केले. रविवारी येथील भाजप मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जी 20 चे अध्यक्षपद प्रथमच पंतप्रधान मोदींना मिळाले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला एक वेगळा दर्जा मिळाला. यामध्ये कर्नाटकाचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. आगामी काळात हे योगदान भाजप सरकार आणखी वाढवेल. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी डबल इंजिनचे सरकार आवश्यक आहे. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार अस्तित्वात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किसान सन्मान योजना कर्नाटकात 94 टक्के जारी आहे. तर केरळसारख्या राज्यात केवळ 56 टक्के ही योजना राबवली गेली आहे. केरळ सरकार केंद्र सरकारशी योग्य समन्वय न ठेवता सर्वसामान्यांवर अन्याय करत आहे. त्यामुळे जनतेला डबल इंजिन सरकारचे महत्त्व समजत आहे. ‘हर घर जल’ योजना प्रत्येक राज्यात लागू झाल्याने देशातील जनता आनंदी आहे. राज्याचे आर्थिक सक्षमीकरण झाले असून पुन्हा एकदा राज्याच्या विकासाला चालना देणे हे भाजप सरकारचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेत भाजपचे राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली, राज्य प्रसारमाध्यम सल्लागार आनंद गुऊमूर्ती, आमदार अनिल बेनके, दादागौडा बिरादार, प्रसारमाध्यम समन्वयक एफ. एस. सिद्धनगौडर, शरद पाटील, नितीन चौगुले, संतोष देशनूर, इंदिरा बाळीकायी, शशिधर बाडकर आदी उपस्थित होते.









