जिल्हा पंचायतीमध्ये ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष बैठकीत मागणी
बेळगाव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रा. पं. विकास अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हा पंचायतीमध्ये करण्यात आले होते. यावेळी ग्रा. पं. पातळीवरील समस्यांची माहिती जाणून घेण्यात आली. विशेष करून बहुतांश ग्रा. पं. अध्यक्षांकडून रोजगार हमी योजनेतील कामे त्वरित सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा पालकमंत्री तसेच यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी उपस्थित ग्राम पंचायत सदस्य, अध्यक्ष-उपाध्यक्ष व पीडीओंना मार्गदर्शन केले. भविष्यात दुष्काळ परिस्थिती अत्यंत गंभीर होणार असल्याने याची पूर्व खबरदारी घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भविष्यातील समस्येवर मात करण्याच्या नियोजनाबाबत ही बैठक बोलाविण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या तालुक्यातील गावांमध्ये माफक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला नागरिकांसाठी रोजगार हमीतील कामे सुरू करून देण्यात यावीत. यामुळे नागरिकांना रोजगार मिळण्यास सोयीचे ठरणार आहे, अशी मागणी बहुतांश ग्राम पंचायतींकडून करण्यात आली. तर अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे रखडली असून गावच्या विकासासाठी रस्ता मंजूर करण्यात यावा. तसेच सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारबांधणी आवश्यक असून कृती योजना तयार करण्यात आली असून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. काही ग्राम पंचायतींकडून नव्याने कूपनलिका खोदाई करण्यासाठी मंजुरी देण्यात यावी. शासनाकडून कूपनलिका मंजूर करून देण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. तर गावांना जोडले गेलेले रस्ते उखडले असून खराब झालेल्या रस्त्याच्ंााr कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत. शेतवडीतील रस्ते निर्माण करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मंजुरी मिळवून देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी यमकनमर्डी मतदारसंघात येणाऱ्या बेळगाव तालुक्यातील विविध ग्राम पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पीडीओ उपस्थित होते.









