माजी खासदार राजू शेट्टी यांचा साखर कारखानदारांना इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ
कोल्हापूर प्रतिनिधी
साखर कारखानदारांनी मागील हंगामातील हिशोब पूर्ण न झाल्याने सद्दस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दूसरा हप्ता चारशे रुपये देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. कारखानदारांची हीभुमिका शेतकरी संघटनांना मान्य नाही. त्यामुळे साखर कारखान्यांनी हंगाम सुरु होण्यापुर्वी हिशोब सादर करावा, अन्यथा कोणत्याही परिस्थितीत यंदाचा साखर हंगाम सुरु होवू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला. तसेच आत्तापर्यंत सनदशीर मार्गाने आंदोलन सुरु आहे. पण दूसरा हप्ता चारशे रुपये मिळणार नसल्यास पुढील काळात उग्र आंदोलन करणार असल्याचेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली मागील हंगामातील ऊसाला दूसरा हप्ता चारशे रुपये देण्यासंदर्भात बैठक झाली. मात्र बैठकीत याबाबत ठोस असा तोडगा न निघाल्याने हि बैठक निष्फळ ठरली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी खासदार शेट्टी यांनी साखर कारखान्यांना दूसरा हप्ता चारशे रुपये द्यावाच लागेल अशी भुमिका मांडली.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी हिशोब पूर्ण न झाल्याने दूसरा हप्ता चारशे रुपये देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हे मान्य नाही. आरएसएफनुसार साखरेचा प्रतिकिलो दर 33 रुपये असताना मध्यंतरी कारखान्यांनी वाढीव दराने साखर विक्री केली आहे. मात्र हिशोबामध्ये 33 रुपयांप्रमाणेच ते साखर विक्री दाखवून ते शेतकऱ्यांची फसवणुक करणार आहेत. सरकारलाही हिशोब करायचा नाही आहे. तसेच उपपदार्थांबाबतही अद्याप धोरण ठरवलेले नाही. यामधून सरकारसह साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरु असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.
आंदोलनावर ठाम, साखर बाहेर पडू देणार नाही
ऊसाला दूसरा हप्ता चारशे रुपये मिळणार नसल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम राहणार आहे. साखर कारखान्यांमधून एक टनही साखर बाहेर पडू देणार नाही आहे. तसेच आत्तापर्यंत आम्ही शासनाला सहकार्य करत सनदशीर मार्गाने शांततेत आंदोलन केले. कारखानदार जर दूसरा हप्ता न देण्यावर ठाम असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या पद्धतीने पुढील काळात ऊग्र आंदोलन करणार असल्याचे शेट्टी यांनी याप्रसंगी सांगितले.
माहिती न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा
दरम्यान बैठकीमध्ये जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या भुमिका सरकारकडे मांडणार आहे. पुढील बैठकीत याबाबत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या साखर कारखान्यांनी मागील गळीत हंगामाची माहिती ऑनलाईन पद्धतीने दिलेली नाही, अशा कारखान्यांवर पुढील 15 दिवसानंतर कारवाई करा, असा आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी साखर सहसंचालक अशोक गाडे यांना बैठकीत दिला.









