शेतकरी प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव ; दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई देण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे. शेतकऱ्यांच्या समस्येकडे सरकारकडूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग अवलंबावा लागत आहे. सरकारकडून भरपाईचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र वेळेत मिळत नसेल तर शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुवर्ण विधानसौध येथे राज्य सरकारचे 4 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन भरणार आहे.अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. नुकसानभरपाई वाढवून देण्यात यावी, यासह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे आवश्यक आहे.मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची अधिवेशनादरम्यान भेट घालून देण्यात यावी, अन्यथा सुवर्णसौधवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींची नावे निश्चित करून द्यावी. त्यानुसार भेट घालून देण्यासाठी आपले प्रयत्न करू, असे सांगितले.









