श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय : तिसऱ्या विजयासह सेमीफायनलच्या आशा कायम :
वृत्तसंस्था/ पुणे
येथील एमसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. मागील सामन्यात पाकिस्तानला दणका दिल्यानंतर या सामन्यातही त्यांनी लंकेला पराभूत करण्याची किमया साधली. अफगाण संघाचा हा सहा सामन्यातील तिसरा विजय असून गुणतालिकेत त्यांनी सहा गुणासह पाचवे स्थान पटकावले आहे. तसेच या विजयासह सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. दुसरीकडे लंकन संघाची सहाव्या स्थानी घसरण झाली असून त्यांचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग कठीण झाला आहे.
प्रारंभी, या सामन्यात अफगाणिस्तान संघाने उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला. त्यांनी सातत्याने श्रीलंकेवर दबाव निर्माण करत श्रीलंकेचा डाव 241 धावांवर संपवला. यानंतर विजयासाठीचे लक्ष्य 45.2 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. 34 धावांत 4 बळी घेणाऱ्या अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. श्रीलंकेची पुढील लढत दि. 2 रोजी भारताविरुद्ध मुंबई येथे होणार आहे.
उमरझाई, रेहमत शाहची शानदार अर्धशतके
लंकेने विजयासाठी दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाण सलामीवीर गुरबाज पहिल्याच षटकांत बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर इब्राहिम झद्रन व रेहमत शाह यांनी एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. ही जोडी जमलेली असतानाच इब्राहिमला मधुशनाकाने बाद करत अफगाणिस्तानला दुसरा धक्का दिला. त्याने 57 चेंडूत 39 धावा केल्या. सलामीचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर रेहमत शाहने कर्णधार हशमतउल्लाह शाहिदीसोबत डावाला आकार दिला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी साकारली. दरम्यान, रेहमत शाहला रजिथाने तंबूचा रस्ता दाखवला. शाहने 7 चौकारासह 62 धावांचे योगदान दिले. रेहमत शाह बाद झाल्यानंतर मात्र हशमतउल्लाह व उमरझाई यांनी चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने 45.2 षटकांतच संघाला विजय मिळवून दिला. हशमतउल्लाहने 74 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह नाबाद 58 तर उमरझाईने 63 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह नाबाद 73 धावांचे योगदान दिले.
लंकन फलंदाजांची सपशेल निराशा
प्रारंभी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवताना लंकेला डाव 49.3 षटकांत 241 धावांवर गुंडाळले. सलामीवीर करुणारत्ने केवळ 15 धावा करून बाद झाला. यानंतर निसंका व कर्णधार कुसल मेंडिस यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना निसंकाला उमरझाईने बाद करत लंकेला दुसरा धक्का दिला. निसंकाने 5 चौकारासह 46 धावा केल्या. निसंका बाद झाल्यानंतर कुशल मेंडिस व समरविक्रमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचे शतक फलकावर लावले. यानंतर मेंडिसला मुजीब रेहमानने त्याला बाद केले. मेंडिसने 3 चौकारासह 39 धावांचे योगदान दिले. पाठोपाठ समरविक्रमालाही 36 धावांवर मुजीबने बाद करत लंकेला चौथा धक्का दिला. यावेळी लंकेची 4 बाद 139 अशी स्थिती होती.
यानंतर चरिथ असालंका 22 धावा, धनजंय डी सिल्वा 14 धावा, अँजेलो मॅथ्यूज 23 धावा, महेश थिक्षण 29 धावा यांनी केलेल्या छोटेखानी खेळीमुळे लंकेला 241 धावापर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे, या सामन्यात लंकेच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी साकारता आली नाही. अफगाणकडून फजलहक फारुकीने 4 बळी घेतले. मुजीब उर रहमानने दोन गडी बाद केले. अजमतुल्ला आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका 49.3 षटकांत सर्वबाद 241 (पथून निसंका 46, कुशल मेंडिस 39, समरविक्रमा 36, महेश थिक्षणा 29, फारुकी 34 धावांत 4 बळी, मुजीब 2 तर रशीद, अजमतउल्लाह एकेक बळी).
अफगाणिस्तान 45.2 षटकांत 3 बाद 243 (इब्राहिम झद्रन 39, रेहमत शाह 62, हशमतउल्लाह शाहिदी नाबाद 58, अजमतुल्लाह उमरझाई नाबाद 73, मधुशनाका 2 तर कसुन रजिथा 1 बळी).
रशीद खनाचा असाही अनोखा विक्रम

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेला श्रीलेंकविरुद्ध सामना रशीद खानसाठी खास ठरला. हा त्याचा वनडे कारकिर्दीतील 100 वा सामना होता. केवळ 25 वर्षाच्या असलेल्या रशीदने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी 99 वनडे सामने खेळताना तब्बल 178 बळी मिळवले आहेत. अफगाणिस्तानसाठी 100 वनडे खेळणारा तो चौथा खेळाडू बनला. अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबीने सर्वाधिक 152 सामने खेळले आहेत. त्यानंतर माजी कर्णधार असगर अफगाणने 114 सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच सध्या संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रहमत शहा 102 सामने खेळलेला आहे.









