जिल्हा रेशन दुकानदार मालक संघटनेतर्फे मंत्री मुनियप्पा यांच्याकडे मागणी
बेळगाव : केंद्र सरकारने रेशनच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अतिरिक्त तांदूळ खरेदी करून बीपीएल कार्डधारकांना 10 किलो धान्य वाटप करावे, अशी मागणी बेळगाव जिल्हा रेशन दुकान मालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्री मुनियप्पा यांची सोमवारी रात्री बेळगाव येथील एका खासगी हॉटेलमध्ये भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. सत्तेतील काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना 10 किलो धान्य वाटपाचे आश्वासन दिले होते. दरम्यान, केंद्र सरकारने रेशन पुरवठा करण्यास असमर्थता दाखविल्याने राज्य सरकारने रेशन ऐवजी प्रति किलो 34 रुपयेप्रमाणे निधी दिला जात आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून रेशनसाठी मिळणाऱ्या तांदळाच्या दरात कपात करण्यात आली आहे. 34 रुपये मिळणारा तांदूळ आता 22.50 रुपये झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या तांदळाची खरेदी करून बीपीएल कार्डधारकांना मासिक 10 किलो तांदूळ वाटप करावा, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. यावेळी अध्यक्ष राजशेखर तळवार, सरचिटणीस दिनेश बागडी, बसवराज दोडमनी, नारायण कालकुंद्री, सुरेश राजुकर, मारुती आंबोळकर, उमा सोनवाडकर आदी उपस्थित होते.









