जवळ जवळ 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपल्या कर्तव्याविषयी भ्रमित झालेल्या अर्जुनाला भगवतगीतेद्वारा मार्गदर्शन केले. हा दिवस मोक्षदा एकादशीचा होता. भगवद्गीतेतील उपदेश केवळ अर्जुनासाठीच नव्हता तर प्रत्येक जीव विशेषतः मनुष्यजन्म प्राप्त केल्यानंतर त्याचे काय कर्तव्य आहे हे सर्वांच्या कल्याणासाठी सांगणारा हा ग्रंथ आहे. जरी हिंदू भगवतगीतेला आपला धर्मग्रंथ मानत असले तरी आज सर्व जगातील लाखो लोक या ग्रंथातून प्रेरणा घेऊन भगवान श्रीकृष्णाची भक्ती करीत आहेत. भगवतगीतेमध्येही भगवान श्रीकृष्ण कुठेही सांगत नाहीत की गीता फक्त हिंदूंसाठी आहे. याउलट भगवान श्रीकृष्ण सांगतात की (भ गी 3.38) न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति।। अर्थात ‘या जगात, दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्यसमयी, स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वाद करतो.’ अज्ञान हे आपल्या सर्व बंधनाचे पर्यायाने दुःखाचे कारण आहे आणि भगवतगीतेमधील ज्ञान हे आपल्या सर्व बंधनातून मुक्तीचे कारण आहे. मनुष्य जेव्हा या भगवतगीतेतील ज्ञानाचा अनुभव घेऊ लागतो तेव्हा त्याला परिपूर्ण आंतरिक आनंद प्राप्त होतो म्हणून त्याला सुख व शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही. या जगातील सर्व दुःखाचे मूळ कारण आहे आपण आपला भगवान श्रीकृष्णाशी असलेला सनातन संबंध विसरून गेलो आहोत. तो पुनःस्थापित करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण भगवतगीतेचे ज्ञान आपल्याला देत आहेत.
आद्य शंकराचार्य भगवतगीतेचे माहात्म्य सांगताना म्हणतात, गीता-शास्त्रम् इदम् पुण्यम् यः पठेत प्रयतः पुमांन । विष्णोः पदम अवप्नोति, भय-शोकदि-वर्जिताः। अर्थात ‘जी व्यक्ती भगवद्गीतेमधील उपदेशांचे पालन करते ती जीवनातील सर्व दुःखे आणि चिंता यापासून मुक्त होते आणि तिचा पुढील जन्म आध्यात्मिक असू शकतो. गीताध्यायन-शिलस्य, प्राणायाम-परस्य च । नैव संति हि पापांनी पूर्व-जन्म-कृतानी च अर्थात ‘जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे व पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंताच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्मांचा त्याच्यावर किंचितही दुष्परिणाम होणार नाही. भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की (भगी 18.66) सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श®ाः ।। अर्थात ‘सर्व विविध प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि फक्त मला शरण ये. मी तुला सर्व पापकर्मातून मुक्तता करीन. याबद्दल तू भय बाळगू नकोस.’ याप्रकारे जो भगवंतांना शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः भगवंत घेतात आणि अशा व्यक्तीची सर्व पापकर्मातून मुक्तता करतात. मलीनेमोचनम् पुंसां जल-स्नानम दिने दिने। सकृदगीतामृत-स्नानं संसारमलनाशनमम् ।। अर्थात ‘प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल, परंतु जर एखाद्याने एकदा जरी पवित्र जलरुपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले, तरी त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते.’
गीता सु-गीता कर्तव्य, किम अन्ये शास्त्र-विस्तारैः। यः स्वयम पद्मनाभस्य, मुख-पद्मद् विनिहस्रीता ।। अर्थात ‘भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्रीभगवान श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही. केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे. वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की, त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्मय नाही आणि त्याची गरजही नाही. भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे. कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. तसेच ती स्वतः श्री पद्मनाभ (श्रीकृष्ण) यांनी सांगितली आहे. भारतामृत-सर्वस्वम्, विष्णु-वत्रद विनिस्रितम् । गीता-गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्याते ।। अर्थात ‘जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते, तर जो भगवद्गीतेचे अमृत प्राशन करतो त्याच्याबद्दल काय सांगावे? भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे कारण ती स्वतः आदिविष्णू भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे.’ भगवद्गीता ही पुरुषोत्तम श्रीभगवान यांच्या मुखातून प्रकट होते तर गंगा त्यांच्या चरणकमळातून उत्पन्न होते. अर्थात भगवंताचे मुख आणि चरणकमळ यामध्ये काहीही फरक नाही. पण निःपक्षपती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, भगवद्गीता ही गंगाजलापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे. म्हणून दुसऱया शब्दात सांगायचे तर, भक्तिभावाने गीतेचे पठण केल्याने जन्म-मृत्यूचे चक्र समाप्त होते. सर्वोपनिषदो गावो, दोग्धा गोपाला-नंदनाः। पार्थो वत्स सुधीरभोक्ता दुग्धम गीतामृतम महत् ।। अर्थात ‘सर्व उपनिषदांचे सार असलेले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता ही एका गायीप्रमाणे आहे आणि गोपाळ म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहेत. अर्जुन हा वासराप्रमाणे आहे तर विद्वानजन आणि शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृततुल्य दूध प्राशन करणारे आहेत. एकं शास्त्रम् देवकी-पुत्र-गीतं, एको देवो देवकी-पुत्र एव । एको मंत्र तस्य नमनि यानि, कर्मप्यएकं तस्य देवस्य सेवा ।। अर्थात ‘वर्तमान काळात लोक एकच शास्त्र, एकच परमेश्वर, एकच धर्म आणि एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. म्हणून एकं शास्त्रं देवकीपुत्र गीतं, अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावे. एको देवो देवकीपुत्र एव अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावेत. एको मंत्रस्तस्य नामानी, एकच मंत्र, एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे श्रीकृष्ण नामाचे स्मरण अर्थात हरिनाम संकीर्तन आणि कर्मप्यएकं तस्य देवस्य सेवा सर्वांसाठी एकच कर्म असावे ते म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा.’
भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे. तो याप्रमाणे आहे, आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असले तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीपणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांचा आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे. भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणूनच केला आहे. याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी उदा. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क, श्रीचैतन्य महाप्रभू अशा अनेकांनी मान्यता दिली आहे.
भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भक्तांसाठीच आहे. भगवद्गीतेचा उपदेश खासकरून अर्जुनालाच सांगण्यात आला. कारण अर्जुन हा भगवंताचा भक्त आहे, साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजेच भगवद्गीता वाचकाने भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱया भक्ताप्रमाणे असले पाहिजे. ज्यावेळी एखादा भगवंताचा भक्त होतो त्यावेळी त्याचा भगवंताबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित होतो. यासाठी भगवद्गीता भक्तिभावानेच स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वतःला आपण श्रीकृष्णांच्या बरोबरीचे आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रे÷ महापुरुष आहेत असेसुद्धा समजू नये. भगवद्गीतेनुसार श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याने तात्विकदृष्टय़ा तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावनेनेच आपण भगवद्गीता जाणू शकतो. जोपर्यंत एखादा नम्र भावनेने भगवद्गीता वाचत नाही, तोपर्यंत तो भगवद्गीता जाणू शकत नाही. कारण भगवद्गीता हे एक रहस्य आहे, ते केवळ श्रीकृष्णाच्या कृपेने केवळ त्यांच्या भक्तांनाच उलगडते.
-वृंदावनदास








