चिन्मय मिशनचे दक्षिण आफ्रिकेतील स्वामी अभेदानंदजी देतील प्रवचने
प्रतिनिधी/ फातोर्डा
मडगाव चिन्मय मिशनतर्फे 36 वा वार्षिक गीता ज्ञानयज्ञ मंगळवार 17 ते रविवार 22 या दिवसात संध्याकाळी 6.30 ते रात्री 8 या वेळेत दवर्ली येथील मारुती मंदिराच्या जवळ असलेल्या बाबू नायक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील चिन्मय मिशनचे स्वामी अभेदानंदजी हे ‘गीता मे शरणागती’ या विषयावर हिंदीतून प्रवचने देतील
यावेळी उद्घाटक म्हणून उद्योजक पांडुरंग (भाई) नायक उपस्थित राहतील. याशिवाय सकाळच्या सत्रात बुधवार 18 ते रविवार 22 या दिवसांत सकाळी 7 ते 8 या वेळेत घोगळ हाउसिंग बोर्डमधील चिन्मय कृष्ण आश्रमात स्वामी अभेदानंदजी यांचे श्रीमद् भागवतमधील पाचव्या अध्यायातील श्री जडभरत आणि राजा रहुगण यांच्या संवादावर आधारित ‘जडभरत गीता’ या विषयावर हिंदीतून प्रवचने होतील, अशी माहिती मडगाव चिन्मय मिशनचे अध्यक्ष बिपीन कंटक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घोगळ हाउसिंग बोर्डमधील चिन्मय कृष्ण आश्रमात ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष श्रीकांत धोंड, आश्रमच्या आचार्य ब्रह्मचारिणी धारणाजी, सचिव सुभाष नगर्सेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीकांत धोंड म्हणाले की, भगवद्गीता ही सर्वांना कळायला हवी. गीतेमध्ये काय आहे, त्याचे महत्त्व आपल्या जीवनात काय आहे याबद्दल माहिती देणारा हा ज्ञानयज्ञ असून स्वामी अभेदानंदजी त्यात याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
ब्रह्मचारिणी धारणाजी यांनी मडगाव चिन्मय मिशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये लहान मुलांसाठी ’बालविहार वर्ग’, आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘’प्री-चिक’ वर्ग, 28 वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तींसाठी ‘सेतुकरी’, महिलांसाठी ’देवी वर्ग’ असे अनेक उपक्रम राबविले जातात, असे त्यांनी सांगितले.









