एसडीएम धारवाड उपविजेता
बेळगाव : जैन इंजिनिअरिंग कॉलेज आयोजित व्हिटीयु विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने एसडीएम धारवाड संघाचा 11-5 अशा गोलफरकाने पराभव करुन व्हिटीयु चषक पटकाविला. विजेता व उपविजेता संघ म्हैसूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय व्हीटीयु स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. हुंचेनट्टी येथील जैन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावरती व्हीटीयु विभागीय हॅन्डबॉल स्पर्धेत या विभागातील 8 संघांनी भाग घेतला होता. जैन इंजिनियरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे. शिवकुमार व क्रीडा प्राध्यापक श्रीहरी लाड व इतर मान्यवरांच्या हस्ते संघाची ओळख करून स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सामन्यांना सुरूवात करण्यात आली.
पहिल्या उपांत्यफेरीच्या संघात जीआयटी बेळगावने जैन इंजिनिअरिंगचा 10-5 अशा गोलफरकाने पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एसडीएम धारवाडने अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजचा अटितटीच्या लढतीत 5-4 अशा गोलफरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात जीआयटी बेळगाव संघाने एसडीएम धारवाड संघाचा 11-5 अशा गोलफरकाने पराभव करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विशांत धमुने, बसवराज होसमनी, ओजस रेवणकर, श्रीहरी लाड, जयसिंग धनाजी, शिवकुमार सुतार, श्रेयस खांडेकर यांच्या हस्ते विजेत्या जीआयटी व उपविजेत्या एसडीएम धारवाड संघांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. 24 मे रोजी म्हैसूर येथे होणाऱ्या व्हिटीयु राज्यस्तरीय हॅन्डबॉल स्पर्धेसाठी विजेता व उपविजेता संघ पात्र ठरला असून हे दोन्ही संघ म्हैसूरला रवाना होणार आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून जयसिंग धनाजी, शिवकुमार सुतार व श्रीहरी लाड यांनी काम पाहिले.









