व्हिटीयु चषक विभागीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : केएलएस जीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू चषक विभागीय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनादिवशी जीआयटी, भरतेश,व्हीटीयू, केएलई हुबळी, एसजीबीआयटी, केएलई सिटी-चिकोडी या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश केला. उद्यमबाग येथील जीआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा प्रा. अरळीमट्टी, एस. आर. धमुने, व्ही.बी. ओजस, आकाश मंडोळकर, विजय रेडेकर, कौशिक पाटील, यश सुतार, अकिलेश अष्टेकर,ओमकार कुंडेकर यांच्या हस्ते चेंडू लाथाडून करण्यात आले.
पहिल्या सामन्यात केएलएस जीआयटी संघाने केएलएस व्हीडीआयटी-हल्याळ संघाचा 2-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात एसडीएम-धारवाडने भरतेश संघाचा 1-0 असा, तिसऱ्या सामन्यात जैन संघाने एसकेएस-कारवार संघाचा टायब्रेकरमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला. चौथ्या सामन्यात व्हीटीयू बेळगावने जेसीईटी-हुबळीचा 1-0 असा निसटता पराभव केला. पाचव्या सामन्यात केएलआयटी-हुबळीने एचआयटी निडसोशी संघाचा 2-0 असा पराभ केला. सहाव्या सामन्यात एसजीबीआयटी बेळगावने-जीसीई संघाचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव केला.
सातव्या सामन्यात एजीएमआर सीईटी-वारुरने केएलई-चिकोडी संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. आठव्या सामन्यात टीसीई-गदग संघ न आल्यामुळे एआयटीएम संघाला पुढे चाल देण्यात आली. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात व्हीटीयू बेळगावने एसडीएम-धारवाड संघाचा 4-2 असा टायब्रेकरमध्ये पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केएलएस-जीआयटीने जैन रिसर्च संघाचा 2-0 असा पराभव केला. तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केएलआयटी-हुबळी संघाने एजीएमआर सीईटी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एआयटीएम संघाने एसजीबीआयटी संघाचा 1-0 असा निसटता पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गुरुवारी उपांत्य सामने
केएलएस जीआयटी-बेळगाव वि. केएलईआयटी-हुबळी यांच्यात सकाळी 8.30 वाजता तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना एआयटीएम-बेळगाव वि. व्हीटीयू-बेळगाव यांच्यात 9.30 वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी अंतिम सामना उपांत्य फेरीतील विजेत्या संघांत होणार आहे.









