व्हीटीयू चषक आंतरमहाविद्यालयीन थ्रोबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एसजीबीआयटी तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू चषक आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेत जीआयटी, केएलई, लक्ष्मेश्वर, व्हीडीआयटी हल्याळ संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एसजीबीआयटी, एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालय आयोजित व्हीटीयू चषक मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंडी, स्पर्धेचे समन्वयक प्रा. आनंद बनकड, क्रीडा प्राध्यापक विजय अरळीमट्टी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी मैदानाची पूजा करण्यात आली. या स्पर्धेत एकूण 8 तांत्रिक महाविद्यालयानी भाग घेतला. सर्व संघांची ओळख प्रमुख पाहुण्यांना करून देण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य बी. आर. पटगुंडी यांनी केले. स्पर्धेची माहिती विजय अरळीमट्टी यांनी दिली. त्यानंतर नेटवरील चेंडू सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक, पंच शंकर कोलकार, राजु चौगुले, यू. वाय. मजुकर आदी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात केएलएस जीआयटी महाविद्यालयाने जैन महाविद्यालयाचा 21-15, 21-16 असा पराभव केला. दुसऱया सामन्यात केएलई महाविद्यालयाने एसजीबीआयटी संघाचा 21-19, 21-17, तिसऱया सामन्यात व्हीडीआयटी हल्याळ संघाने एआयटीएम अंगडी महाविद्यालय संघाचा 21-14, 21-18, चौथ्या सामन्यात एसकेएस लक्ष्मेश्वर संघाने एसएनडी संघाचा 21-17, 17-21, 15-12 असा पराभव केला. केएलएस जीआयटी, व्हीडीआयटी हल्याळ, केएलई व लक्ष्मेश्वर संघांनी या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.