मंडणगड :
लग्न हंगामात वेगवेगळ्या दिवशी होणाऱ्या लग्नांमुळे ’होणारा अवास्तव खर्च टाळण्यासाठी गावातील मुलींची लग्ने एकाच दिवशी वेगवेगळ्या शुभमुहूर्तावर घेण्याचा निर्णय टाकवली स्थानिक ग्रामस्थ, मुंबईकर आणि महिला मंडळाच्या संयुक्त सभेत एकमुखाने घेण्यात आला. तसेच हळदी समारंभात दारु, मटणावर बंदी आणत अनेक अनिष्ठ प्रथांना मूठमाती देण्यात आली. टाकवली ग्रामस्थांनी घेतलेले हे निर्णय सध्या जिल्ह्यात चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरले आहेत.
गावातील सामाजिक ऐक्य, एकता, टिकविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ मंडळ, मुंबई ग्रामस्थ मंडळ आणि टाकवली महिला मंडळ यांच्या समन्वयातून गावाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी महादेव रक्ते यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत चर्चेअंती गावाच्या हिताचे निर्णय एकमताने मंजूर करण्यात आले. सहकार, श्रमदान व निर्व्यसन या त्रिसूत्रीवर काम करण्याचा संकल्प करणाऱ्या टाकवली येथील ग्रामस्थांनी बदलत्या काळातील अनिष्ठ प्रथा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या चालीरिती मोडीत काढून नव्याने विज्ञानाची कास व अध्यात्माची साथ करत वायफळ होणाऱ्या खर्चाला आळा घालणारे ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी घेतले आहेत. या विचारांना तऊणांनी दिलेली साथही महत्वाची ठरली आहे.
यामध्ये लग्न व हळदी समारंभात दारु, मटण बंदी करण्यात आली. अवास्तव खर्च टाळण्यासाठी गावातील मुलींची लग्न एकाच दिवशी वेगवेगळ्या शुभमुहूर्तावर घेण्याचे ठरवण्यात आले. सुख-दु:खात कपड्यांचा करण्यात येणारा आहेर बंद करण्यात आला. तसेच शिमगा सणात आपली श्रद्धा जोपासताना काही खर्चिक गोष्टींना आळा घालण्याचे निर्णय सभेत घेण्यात आले.
- जमीन विक्रीस बंदी
जमीन विकण्याला बंदी घालण्यात आली. एखाद्या ग्रामस्थाला गरज भासली तर त्याची गाव योग्य ती आर्थिक सोय करेल किंवा गावातीलच व्यक्ती जमीन विकत घेईल, असे ठरवण्यात आले. या निर्णयांना सर्व सभासदांची भक्कम साथ दिली आहे. गावातील ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी अबाधित राहण्यासोबत विकासात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी तिन्ही मंडळांचे पदाधिकारी व सदस्य, टाकवली ग्रामस्थ, महिला आणि मुंबईकर उपस्थित होते.








