अहिल्या परकाळे,कोल्हापूर
Kolhapur News : शाळा-महाविद्यालय सुरू झाले की एकच दिवस मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात.त्यानंतर वर्षभर स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी महाविद्यालयाकडे वेळच नसतो.त्यामुळे मुलींचे संरक्षण शाळा-महाविद्यालयांसाठी इव्हेंटच झाला आहे.
मुलींवरील अत्याचारात वाढ झाल्याने प्रत्येक शाळा-महाविद्यालयाने मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची सक्ती शासनाने सक्तीचे केले आहे.त्यामुळे शाळा-महाविद्यालये काही सामाजिक संस्थांबरोबर टायअप करून शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच मुलींना प्रशिक्षण देत आहेत.एखाद्याने हल्ला केलास तर त्यापासून कसे संरक्षण करायचे, मदतीसाठी कोणाला फोन करायचा आदीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. मात्र एक-दोन दिवसाच्या प्रशिक्षणाने खरंच मुली स्वसंरक्षण करू शकतील का? हा प्रश्न आहे.कित्येकदा चूक नसताना मुलींना संकटांचा सामना करावा लागतो.अशा कठीणप्रसंगी त्या गोंधळतात,अशावेळी शाळा-महाविद्यालयात ाrल स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचा त्यांना फायदा होईल.पण एक-दोन दिवसांचे प्रशिक्षण केवळ सोपस्कारासारखे नसावे, ते परिपूर्ण हवे, अशी प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहे.
शाळा-महाविद्यालयात वावरताना अडचण आल्यास शिक्षकांना सांगू शकेल एवढा विद्यार्थिनींचा विश्वास शिक्षकांनी संपादन करणे आवश्यक आहे. आपण संबंधीत अडचणीवर उपाययोजना करू शकतो, याची शाश्वतीही दिली पाहिजे. मुलींनीही शिक्षक, पालकांबरोबर वेळीच चर्चा केली तर पुढचे अनर्थ टळण्यास मदत होणार आहे. पालकांनी पाल्यांच्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत, हे जाणून घेतले पाहिजे. पाल्य चुकत असेल त्यांना वाईट गोष्टींपासून परावृत करण्याची जबाबदारी पालकांचीच आहे. समाजानेही अशा गोष्टीकडे दुर्लक्ष न करता पोलिसांना माहिती द्यावी. तसेच मुलींच्या संरक्षणासाठी पुढे येण्याची गरज आहे.
शारीरिक, मानसिक स्वास्थ्याची गरज
मुलींचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते ठेवावे. जेथे कठोर वागायला पाहिजे तेथे तशी भूमिका घेतली पाहिजे. परंतु नको तेथे बंधने घालून त्यांची मानसिकता बिघडवू नये.
अभ्यासक्रमात स्वसंरक्षण विषय असावा
शासनाने मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना शाळा-महाविद्यालयांना दिल्या. एनसीसी, एनएसएसप्रमाणे स्वसंरक्षण प्रशिक्षण स्वतंत्र विषय असावा.या विषयाला 5 गुण देऊन त्याचा परीक्षेच्या गुणांमध्ये समावेश करावा. त्यातून मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण मिळेल.
मुलींना वर्षभर स्वसंरक्षणाचे धडे द्यावे
मुलींना वर्षभर स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. मुलींची आरोग्य, हिमोग्लोबीन तपासणी केली पाहिजे. मानसिकदृष्ट्या त्या सक्षम होण्यासाठी त्यांचे मनोबल वाढीसाठी समुपदेशन हवे.
डॉ. भारती पाटील (ज्येष्ठ राजकीय अभ्यासक)
निर्भयाची संपूर्ण माहिती द्यावी
मुलींना स्वसंरक्षणासंदर्भात संपूर्ण प्रशिक्षणासाठी एक दिवसाचा इव्हेंट पुरेसा नाही. तर त्यांना महिनाभर प्रशिक्षण देऊन निर्भया पथकाविषयी संपूर्ण माहिती दिली पाहिजे. कोणता नंबर डाईल केल्यानंतर मदत मिळेल, याची माहिती द्यावी. महिला कमिटी स्थापन करून मुलींचे समुपदेशन केले पाहिजे.









