झिरो ट्रफिकमधून हृदय आणले धारवाडहून बेळगावला : केएलई इस्पितळात 22 वषीय तरुणाचे हृदय प्रत्यारोपण
प्रतिनिधी /बेळगाव
अपघातात जखमी होऊन ब्रेनडेड झालेल्या एका 15 वषीय मुलीच्या अवयवदानामुळे चौघा जणांना जीवदान मिळाले आहे. हृदय प्रत्यारोपणासाठी धारवाडहून या मुलीचे हृदय बेळगावला आणण्यात आले. धारवाड व बेळगाव पोलिसांनी यासाठी ग्रीन कॉरिडॉरद्वारे रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.
गोकाक तालुक्मयातील एक 22 वषीय तरुण हृदयरोगाने त्रस्त होता. त्याच्यावर येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार सुरू होते. धारवाड येथील श्री धर्मस्थळ मंजुनाथ वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळात दाखल झालेल्या मुलीचे ब्रेनडेड झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.
गोकाक येथील 22 वषीय तरुणासाठी धारवाड येथून रुग्णवाहिकेतून त्या मुलीचे हृदय बेळगावला आणण्यात आले. तर त्या मुलीचे एक मूत्रपिंड एसडीएम इस्पितळ व दुसरे हुबळी येथील तत्वादर्श इस्पितळात उपचार घेणाऱया रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात आले. तर स्वादुपिंड बेंगळूर शेषाद्रीपुरम येथील अपोलो इस्पितळाला विमानाने पाठविण्यात आले.
अवयवदानानंतर हे अवयव संबंधित इस्पितळापर्यंत वेळेत पोहोचावेत यासाठी धारवाड व बेळगाव पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर व झिरो ट्रफिकची व्यवस्था केली. यासाठी केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळाचे डॉक्टर व कर्मचारी धारवाडला गेले होते. त्यांनी विनाविलंब हे हृदय बेळगावला आणले. त्यानंतर लगेच प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला प्रारंभ झाला.
तब्बल सहा तास शस्त्रक्रिया
डॉ. रिचर्ड सालढाणा, डॉ. मोहन गान, डॉ. आनंद वागराळी व इतर डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया हाती घेतली. तब्बल सहा तासांची ही शस्त्रक्रिया झाली. अवयवदानाचा निर्णय घेऊन चौघा जणांना जीवदान देणाऱया त्या बालिकेच्या कुटुंबीयांचे आभार तर बेळगाव व धारवाड पोलिसांचे कौतुक करण्यात आले. संततधार पावसामुळे हे अवयव वेळेत पोहोचतील की नाही, अशी शंका होती. मात्र पोलिसांनी झिरो ट्रफिकची व्यवस्था करून ते वेळेत पोहोचविण्यास मदत केली. डॉ. एम. व्ही. जाली यांनीही पोलिसांचे अभिनंदन केले आहे.









