ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दहा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींना शाळेत प्रवेश देऊ नये. मुलींना तिसरीपर्यंतच शिक्षण घेण्याची परवानगी असेल, असा अजब फतवा तालिबान सरकारने काढला आहे. तालिबान सरकारच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानातील महिला सामाजिक कार्यक्षेत्रातून हद्दपार होण्याची शक्यता आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबान सरकारमधील शिक्षण अधिकाऱ्यांनी गजनी प्रांतातील शाळा आणि शैक्षणिक संस्थाना दहा वर्षापुढील मुलींना शाळेत प्रवेश देऊ नये, असा सूचना दिल्या आहेत. मुलींना फक्त तिसरीपर्यंतच शिक्षणाची परवानगी असेल. तसेच सध्या शिकत असलेल्या मुलींना घरी परत पाठवावे, असे शाळांना सांगण्यात आले आहे. याआधी तालिबानमधील मुलींना सहावीच्या वर्गापर्यंत शिकण्याची परवानगी होती, पण त्यात आणखी घट करण्यात आली आहे.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये तालिबानने कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या मुलींवर बंदी आणली होती. तालिबान सरकारने महिलांना सार्वजनिक ठिकाणी काम करण्यास बंदी घातली होती. तसेच महिलांना स्थानिक आणि बिगर-सरकारी संस्थांमध्ये काम करण्यास विरोध केला होता. त्यावर संयुक्त राष्ट्राने टीका केली होती. तालिबान महिलांचे अधिकार आणि हक्क संकुचित करत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटलं होतं. मात्र, संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्याचा तालिबान सरकारवर किंचितही फरक पडलेला दिसत नाही.









