कोल्हापूर :
सहा महिने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्नास नकार दिल्याने प्रियकराने मैत्रिणीचा चाकूने भोसकून निर्घुण खून केला. समीक्षा रोहीत धुमाळ (वय 23 मुळ रा. कसबा बावडा, सध्या रा. सरनोबतवाडी) असे मृत तरुणीचे नांव आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सरनोबतवाडी येथील पेट्रोलपंपाशेजारील अमृतनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी सतीश यादव (मुळ रा. उंड्री ता. पन्हाळा सध्या रा. शिवाजी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इव्हेंटमॅनेजमेंटचे काम करणारी समीक्षाची आई, बहीण व लहान भाउ कसबा बावडा येथे राहतात. गेल्या सहा महिन्यापासून समीक्षा सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात सतीश यादव याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. तिच्या सोबत तिची मैत्रीण आयषु राजेंद्र अंपले (रा. तेलंगणा) ही राहत होती. गेल्या 15 दिवसांपासून सतीश यादव व समीक्षा यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. या वादाला कंटाळून समीक्षा व तिची मैत्रीण आयषु कसबा बावडा येथील समीक्षाच्या मुळ घरी राहण्यास आल्या होत्या. याचदरम्यान सतीश समीक्षाला वारंवार फोन करुन लग्नाची मागणी घालत होता. तसेच फ्लॅटचे भाडे वाढत असून, जून महिन्याच्या 10 तारखेपूर्वी फ्लॅट सोडायचा असल्याचे सांगत होता. मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास समीक्षा व आयषु या दोघी सरनोबवाडी येथे फ्लॅटवर साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरुन गेल्या होत्या. यावेळी समीक्षाने सतीशला फोनकरुन आम्ही साहित्य घेवून जाण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. अवघ्या 10 मिनीटात सतीशही फ्लॅटवर आला. त्याने पुन्हा समीक्षाला लग्न करण्याची मागणी केली. यातून या दोघांमध्ये वाद झाला. आयुषी बेडरुममध्ये साहित्याची आवराआवर करत होती. वादाचा आवाज एकून आयुषी बाहेर आली. तिने वाद थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र सतीशने तिला ढकलून देवून समीक्षाच्या छातीवर चाकूने वार केला. हा वार छातीत खोलवर गेल्यामुळे चाकू छातीत तसाच अडकून राहिला. समीक्षा ओरडत रक्ताच्या थारोळ्यात पडली असतानाच समीक्षाला लाथाबुक्यांनी मारहाण करुन सतीशने घटनास्थळावरु पळ काढला. जाताने त्याने फ्लॅटला बाहेरुन बंद करुन घेतला. दरम्यान या घटनेची माहिती आयुषीने समीक्षाच्या आई व भावास दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आयुषीने दार उघडण्याचा प्र्यात्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. यावेळी समीक्षाने जखमीअवस्थेतच मित्र अभिषेक सोनवणे याला याची माहिती दिली. पंधरा मिनीटातच अभिषेक घटनास्थळी दाखल झाला. त्याने फ्लॅटची कडी बाहेरुन काढून रिक्षातून समीक्षाला उजळाईवाडी येथील एका खासगी हॉस्पटीलमध्ये दाखल केले, मात्र तत्पूर्वीच समीक्षाचा मृत्यू झाला होता. यानंतर तिला सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- आई तु काळजी करु नकोस आता मी घर चालवते
समीक्षाची आई सुवर्णा या मासे विकण्याचे काम करतात, तर लहान बहीण गौतमी व भाउ वैभव हे शिक्षण घेत आहेत. याच्या कामावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करुन समीक्षाला चांगले पैसे मिळत होते. मंगळवारी दुपारी आईसोबत समीक्षा व आयषु या तिघींनी एकत्र जेवण केले. आईला औषध देवून समीक्षा व आयषु बाहेर पडले. यावेळी आई तु आता काळजी करु नकोस मी घर चालवते असा आधार देवून ती बाहेर पडली आणि समीक्षा मृतअवस्थेतच घरी परतली.
- सहा महिन्याचा संसार
समीक्षाचा लक्षतीर्थ वसाहत येथील रोहीत धुमाळ याच्यासोबत 2020 मध्ये विवाह झाला होता. अवघ्या सहा महिन्यातच समीक्षा माहेरी परत आली होती. यानंतर ती परत सासरी गेलीच नाही. समीक्षा व तिचा नवरा रोहीत यांच्यामध्ये घटस्फोटाचा खटला न्यायालयात आहे. हा खटला संपल्यानंतर समीक्षाचे लग्न करण्यात येणार होते.
- क्लब चालक असल्यामुळे लग्नास नकार
मुळचा उंड्री येथील असलेला सतीश हा गेल्या दोन वर्षापासून शिवाजी पेठ येथे राहत होता. शिवाजी पेठ येथे क्लब चालवित होता. गेल्या सहा महिन्यापासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. समीक्षाच्या घरच्यांनी तिचे दुसरे लग्न करण्याचे नियोजन केले होते. यामुळे सतीश वारंवार तिला लग्नासाठी मागणी घालत होता.
- रिक्षातून दवाखान्यात
समीक्षावर हल्ला झाल्यानंतर तिला रिक्षातून जखमी अवस्थेत उजळाईवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिचे इव्हेंट मॅनेजमेंटचे आणखी काही मित्र आले. त्यांनी एका व्हॅनमधून सिपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. मैत्रीण आयषु आणी बहीण गौतमी या दोघींच्या अंगावरील कपडेही रक्ताने माखले होते.








