सावंतवाडीतील घटना ; प्रियकर पसार ; शोध सुरु
सावंतवाडी –
प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलत असल्याच्या रागातून एका २३ वर्षीय युवतीने सावंतवाडी राजवाडा समोरील मोती तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . हा प्रकार तेथील जागृत नागरिकांच्या निदर्शनास येताच महिलांच्या मदतीने तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले . तात्काळ या घटनेची माहिती पोलीस यंत्रणेला दिल्यानंतर पोलीस दाखल होत त्या युवतीला ताब्यात घेतले . हा प्रकार बुधवारी सकाळी १०. ३० वाजण्याच्या सुमारास घडला . सदरची युवती कुडाळ तालुक्यातील असून ती सावंतवाडी बाजारपेठेतील एका दुकानात कामाला आहे . आज सकाळी ती कामावर येत असताना तिला एका मैत्रिणीकडून समजले की , तुझा प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलत आहे . त्यामुळे संतापलेल्या युवतीने आपल्या प्रियकराला सावंतवाडीत बोलावून घेतले . या दोघांचे काही वर्षांपासून प्रेम संबंध होते . तू दुसऱ्या मुलीशी का बोलतोस यावरून दोघांचे भांडण झाले . भांडण करीत करीत ते मोती तलावाच्या काठापर्यंत गेले . तेथे दोघांमध्ये झटापट झाली . युवतीने प्रियकराचा मोबाईल हिसकावून घेत बाचाबाची सुरु झाली . हा प्रकार तलावाच्या जाण्याऱ्या महामार्गावरील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना निदर्शनास आला . सदरची युवती रागाच्या भरात मोती तलावात आत्महत्या करण्याच्या बेतात असताना नागरिकांनी महिलांच्या मदतीने तिला पकडून आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले . यावेळी गर्दीचा फायदा घेत प्रियकर तेथून निसटला . पोलिसांनी तिला ताब्यात घेत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेले . त्यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी तिच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली . त्यावेळी तिच्या आत्महत्या करण्यामागचे गूढ उघड झाले . संबंधित युवतीच्या पालकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तिचे पालक पोलीस ठाण्यात हजर झाले . तिचा जबाब घेऊन त्यानंतर युवतीला पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे . तसेच प्रियकराचाही शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार अशी माहिती पो . निरीक्षक श्री अधिकारी यांनी दिली .









