रेल्वे कर्मचाऱ्यासह तीन जणांना अटक
वृत्तसंस्था/ करीमगंज
एका अल्पवयीन मुलीची हत्या करणे आणि तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तीन आरोपींमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याचा समावेश असून तो संबंधित मुलीचा प्रियकर देखील होता.

आरोपी रेल्वे कर्मचारी या मुलीवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. मुलीने नकार दिल्यावर त्याने मित्रांसोबत मिळून तिची हत्या केली आहे. ही घटना आसामच्या करीमगंज जिल्ह्यात घडली आहे. पोलीस अधिकारी पार्थ प्रतिम दास यांच्यानुसार मुलीची हत्या 9 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता घडली आहे. त्यावेळी आरोपी बळजबरीने पीडितेच्या घरात शिरले होते. त्यांनी मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहावर बलात्कार केला होता. तर मुलीचा मृतदेह करीमगंज शहरात आढळून आला होता.
या मुलीच्या हत्येप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांना मृत मुलीच्या नोटबुकमध्ये एक मोबाइल क्रमांक आढळून आला. त्याच्या आधारावर पुढील तपास करत पोलिसांनी विप्लव पॉल, शुभ्र मालाकार आणि राहुल दास या तीन आरोपींना अटक केली आहे. मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, तिच्यासोबत शारीरिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मुलीने याला नकार दिला होता असे राहुल दासने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले.
राहुल दास हा रेल्वेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे. राहुल दासने शुभ्र मालाकारकडून दोन मोबाइल सिमकार्ड घेतले होते, त्यांचा वापर राहुल अन् पीडित मुलीने केला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले.









