कडेगाव :
माळीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात प्रांजली राहुल माळी (वय-६, रा. माळीनगर, कडेगाव) या बालिकेचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, कडेगावातील माळीनगर येथे प्रांजली हिचे वडील राहुल माळी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रांजली ही तिच्या मोठ्या बहिणीसह शेजारी असलेल्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी निघाली होती. यावेळी मागून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रांजली हिच्या मानेला व गळ्याला जोरदार चावा घेतला. त्यामुळे प्रांजली ही जमिनीवर कोसळली. तर मुलींचा आरडाओरडा ऐकून शेतात काम करीत असलेले प्रांजली हिचे वडील राहुल हे धावत आले. परंतु तोपर्यंत प्रांजली ही गंभीर जखमी झाली होती. वडील राहुल व नातेवाईकांनी तिला उपचारासाठी तात्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालय, कऱ्हाड येथील कृष्णा, सह्याद्रि येथे प्राथमिक उपचारानंतर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
येथे उपचार सुरु असताना काल मंगळवारी (१८) रोजी दुपारी पावणे बाराच्या सुमारासतिचा मृत्यू झाला. या घटनेने माळीनगरसह शहरावर शोककळा पसरली आहे.
- कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
कडेगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे. त्याची नगरपंचायत प्रशासनाने दखल घेतली असून याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल.
डॉ. पवन म्हेत्रे, मुख्याधिकारी, नगरपंचायत कडेगाव








