कोल्हापूर :
मेंदू व मज्जातंतूंशी निगडित असणाऱ्या दुर्मिळ सबक्यूट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटीस (एसएसपीई) आजाराने ग्रस्त एका बालिकेचा रविवारी सायंकाळी दुदैवी मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसापासून शहरातील एका खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू होते. गेली 6 महिने ती या आजाराशी झूंज देत होती. अथक प्रयत्न करूनही अखेर तिला मृत्यूने गाठले. तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सहा महिन्यापूर्वी तिला पहिल्यांदा फिट आली होती. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेवूनही त्रास कमी न झाल्याने तिला शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. सर्व तपासण्या केल्यानंतर तिला दुर्मिळ इएसपीई विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्मिळ आजारावर जगात कोणतेच औषध उपलब्ध नसल्यामुळे वडीलांसह सर्वच नातेवाईक हतबल झाले होते. तरीही बालिकेच्या वडिलांनी औषधोपचारासाठी चीन व थायलंड येथुन औषधे घेवून उपचार केले होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
मध्यंतरी काही प्रमाणात प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, या आजारावर दीर्घकालीन औषध उपचार उपलब्ध नाही. त्यातच उपलब्ध औषधांना सुमारे 15 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत देवून आणि उपचार सुरू ठेवण्यास सांगितले. गेली पंधरा दिवसांपासून तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी तिची प्रकृती खालावली व सायंकाळी तिची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.








