पाच वर्षांची बहीण बचावली
बेळगाव : पावसामुळे भिंत कोसळून तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला. गोकाक येथील महालिंगेश्वर कॉलनीमध्ये सोमवारी पहाटे ही घटना घडली असून या दुर्घटनेतून आणखी एक मुलगी बचावली. कृतिका नागेश पुजारी (वय 3 वर्षे 9 महिने) असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. कृतिकाशेजारीच झोपलेली पाच वर्षांची तिची बहीण या दुर्घटनेतून बचावली आहे. तिला गोकाक येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे सोमवारी पहाटे भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली सापडून कृतिकाचा मृत्यू झाला. कृतिका आणि तिची बहीण भिंतीजवळ झोपल्या होत्या. तर दुसऱ्या खोलीत तिचे आई-वडील झोपले होते. भिंत कोसळताच आई-वडिलांना जाग आली. त्यावेळी कृतिका ढिगाऱ्याखाली सापडली होती. तिच्या बहिणीवरही माती कोसळली होती. आई-वडिलांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला बाहेर काढले. गोकाक शहर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून तहसीलदारांसह नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.









