सातारा :
सातारा शहरातील करंजे येथील बसाप्पा पेठेत राहत असलेली अल्पवयीन मुलगी स्कूल बसमधून उतरली. ती राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पोहचताच आर्यन चंद्रकांत वाघमळे (रा. मोळाचा ओढा सातारा) याने तिला पकडून चाकूचा धाक दाखविला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे मुलगी घाबरली अन् तिने आरडाओरडा केला. ही बाब स्थानिक रहिवाश्यांच्या लक्षात आली. सगळ्यांनी पार्किंगमध्ये धाव घेतली. त्याला सगळे समजून सांगत होते. परंतु काही केल्या तो ऐकत नव्हता. याच परिसरातून जाणाऱ्या सातारा शहर पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी प्रसंगावधान राखून स्थानिकांच्या मदतीने मुलीचे प्राण वाचवले.
एकतर्फी प्रेमातून मुलींवर पुण्यासह राज्यातील इतर जिह्यात खूनी हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या तुलनेत सातारा जिह्यात अशा घटना घडत नाहीत असा अंदाज नेहमीच व्यक्त होतो. परंतु सोमवारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बसाप्पापेठेत अशीच घटना घडली. या परिसरात राहणारी एक 15 वर्षाची मुलगी स्कूल बसमधून उतरली. ती राहत असलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गेली. इतक्यात आर्यन वाघमळे हा युवक तिच्या मागे आला. त्याने मुलीला अडवून माझ्याशी बोलत का नाही अशी विचारणा केली. मुलीने बोलण्यास नकार देताच त्याने चाकू काढला. तिला पकडून बाजूला नेले. अचानक घडलेला हा प्रसंग पाहून तिने आरडाओरडा केला. यामुळे परिसरातील रहिवाशी धावत आले. त्याच्या हातात चाकू पाहून मुलीला सोड असे म्हणू लागले. परंतु तो काही केल्या ऐकत नव्हता. याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका युवतीने या घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सुरूवात केली.
या घटनेची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार सागर निकम, धीरज मोरे यांना कळली. त्यांनी घटनास्थळी जावून तात्काळ मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण काही केल्या आर्यन मुलीला सोडत नव्हता. अमोल इंगवले (रा. कंरजे सातारा), उमेश आडागळे (रा. दिव्यनगरी सातारा) यांनीही घटनास्थळी धाव घेतली. याच वेळी एकाने पाठीमागून जावून मुलाचा हात पकडून चाकू हिसकवण्याचा प्रयत्न केला. तोच सगळयांनी धावत येऊन मुली सोडवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मुलीला व आणखी एका व्यक्तीला चाकू लागल्याने दोघेही किरकोळ जखमी झाले.
- आर्यनला नेले शाहूपुरी पोलीस ठाण्यात
आर्यनच्या हातातून चाकु काढून घेत त्याला पोलिसांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेला. तिथे घडलेला प्रकार सांगितला. यावेळी मुलीचे आई, वडील ही गेले. त्यानंतर मुलाच्या आई वडिलांनाही पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. यावेळी पोलिसांनी चौकशी सुरू करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
- काही दिवसापासून करत होता पाठलाग
बसाप्पापेठेत राहत असलेल्या मुलीचा काही दिवसापासून आर्यन पाठलाग करत होता. याच्या आधी त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु ती वारंवार नकार देत होती. यामुळे चिडून जाऊन त्याने मुली चाकूचा धाक दाखवून प्रेमसंबंध ठेव नाहीतर जिवे मारीन अशी धमकी देत होता. परंतु या हल्ल्यात ती किरकोळ जखमी झाली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पालकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- पोलीस व स्थानिकांच्या मदतीने टळला मोठा प्रसंग
इतर जिह्यात घडलेल्या घटनांमध्ये युवती, महिला यांच्यावर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यावेळी कोणीही मदतीला येत नाहीत. सगळेच बघ्याची भूमिका घेत असतात. परंतु साताऱ्यातील मुलीसोबत घडलेला प्रसंगावेळी सगळे वाचवण्यासाठी धावून गेले. नाहीतर मोठा प्रसंग मुलीसोबत घडला असता.
- शाळा प्रशासनाकडूनही मुलाविरुद्ध तक्रार
आर्यन वाघमळे विरूद्ध पोक्सो, विनयभंग, हत्यार कायदा, जखमी करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारची कलमे लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या आधी ती मुलगी आर्यन विरूद्ध तक्रार देण्यासाठी गेल्याची माहिती मिळत आहे. तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यात आर्यन विरूद्ध शाळा प्रशासनाकडून तक्रार दाखल असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत चौकशी करत आहे.








