ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वीच झाला आहे. यावेळी पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गट ९ आणि भाजप ९ असे एकूण १८ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र, यामध्ये महिलांसह अनेक शिंदे गट आणि भाजप गटातील नेत्यांना डावलण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सल बोलून दाखवली. पंकजा मुंडे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये. तर एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदासाठी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घ्यावी, असा सल्ला त्यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. तर पंकजा यांच्या विधानावर आता भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश (Girish Mahajan) महाजन यांनी महत्त्वाचं विधान केलंय. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही प्रत्युत्तर दिलं.
कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांचं जळगावमध्ये आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तर्फे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “राज्यातील विविध विकास कामांना गती दिली जाईल. लवकरच खाते वाटपाबाबत निर्णय घेण्यात येईल.”
गोपीनाथ मुंडे यांच्याशी निगडित लोकांना बाजूला ठेवण्यात आल्याचा, ओबीसींबवर अन्याय केल्याचा आरोप होतोय. यावर गिरीश महाजन म्हणाले, “त्यांना सांगा गुलाराव पाटील ओबीसी आहेत. मी (गिरीश महाजन) सुद्धा ओबीसी आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आहात म्हणून ओबीसी आहेत, असं समजू नका. यादी बघतिली, तर मोठ्या प्रमाणात ओबीसी आहेत. सगळ्यानांच न्याय दिला गेला आहे.”
“पंकजा मुंडे नाराज नाहीत, माध्यमंच त्या नाराज असल्याचं वारंवार सांगत आहेत. त्या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आणि कोअर कमिटीच्या सदस्य आहेत. त्या मध्य प्रदेशसारख्या राज्याच्या प्रभारी आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेऊन यापेक्षाही चांगली संधी देतील,” असं सूचक विधान गिरीश महाजन यांनी केलं.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे
एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलण्याचे प्रकार अनेकदा झाले आहेत. अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी संबंधित जे लोक आहेत, त्यांना डावलले जात आहे. पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. आता देखील त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात घेतील की नाही, याबाबत शंका वाटते. परंतु त्यांनी मंत्रिमंडळात येण्यासाठी काही काळ वाट न पाहता वरिष्ठांना भेटावे, असं एकनाथ खडसे म्हणाले.