आज जाहीर होणार निवड, एकमेव उमेदवारी अर्ज, मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून अभिनंदन, पालिका मंडळात भेदभाव नाही : बोरकर
प्रतिनिधी / वास्को
मुरगावच्या नगराध्यक्षपदी नगरसेवक गिरीष बोरकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत केवळ बोरकर यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे आज शुक्रवारी होणाऱ्या पालिका मंडळाच्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यमान नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका मंडळात हालचालींना सुरवात झाली होती. भावी नगराध्यक्ष म्हणून गिरीष बोरकर यांच्याच नावाची चर्चा हेती. काल गुरूवारी दुपारपर्यंत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, नगराध्यक्षपदासाठी ईच्छुक उमेदवार म्हणून केवळ गिरीष बोरकर यांनी अर्ज दाखल केला. प्रातिस्पर्धी उमेदवार कुणीच नसल्याने मुरगावचे नवीन नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुरगाव पालिका मंडळाची आज शुक्रवारी सकाळी 11 वा. बैठक होणार असून या बैठकीला मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. गिरीष बोरकर यांची मुरगावच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे ते या बैठकीत जाहीर करतील.
गिरीष बोरकर हे मुरगावच्या प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक असून विद्यमान पालिका मंडळाच्या मागच्या सव्वा दोन वर्षांच्या काळातील ते तिसरे नगराध्यक्ष ठरणार आहे. पालिका मंडळातील बहुसंख्य नगरसेवकांमध्ये पूर्वीच झालेल्या सामंजस्यातून बोरकर यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. नगराध्यक्षांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने मुरगावच्या काही नगरसेवकांनी ही निवडणुक नगरसेवकांमधील एकजुट दाखवून देत नसल्याचे म्हटले आहे. गिरीष बोरकर यांनी पालिका मंडळात कोणताही वाद किंवा भेदभाव नसल्याचे स्पष्ट करून आपण सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे म्हटले आहे. गिरीष बोरकर हे आमदार दाजी साळकर यांचे घनिष्ठ समर्थक आहेत.
मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून अभिनंदन, सहकार्याचे आश्वासन
नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर गिरीष बोरकर यांनी आमदार दाजी साळकर यांच्या समवेत दाबोळीचे आमदार व मुरगावचे पालकमंत्री माविन गुदिन्हो यांची भेट घेतली. मंत्री गुदिन्हो यांनी त्यांचे अभिनंदन केले. पालिका मंडळाने एकजुट दाखवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पालिकेची सर्व कामे यशस्वीपणे व्हावीत यासाठी सरकारतर्फे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी बोरकर यांना दिले. आमदार साळकर यांनीही सर्व नगरसेवकांनी बोरकर यांना बिनविरोध निवडून सर्वजण एकत्र असल्याचे दाखवून दिल्याने पालिका मंडळात विरोधक नसल्याचे स्पष्ट केले. पालिका क्षेत्राच्या विकासासाठी या क्षेत्रातील आपल्यासह मंत्री माविन गुदिन्हो व आमदार संकल्प आमोणकर एकमेकांच्या सहकार्याने काम करीत असून पालिकेला आवश्यक मदत सरकारकडून मिळणार आहे. मुरगावात पुढे चांगली कामे होतील अशी ग्वाही आमदार साळकर यांनी दिली.









