पुणे / प्रतिनिधी :
खासदार गिरीश बापट यांच्यावर प्रचारासाठी कोणताही दबाव आणलेला नसून, ते स्वखुशीनेच प्रचारात उतरल्याचे माजी खासदार व भाजपा नेते संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचार रंगात आला असून, भाजपाचे हेमंत रासने व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात या मतदारसंघात काटय़ाची टक्कर होत आहे. कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, टिळक घराण्याला उमेदवारी डावलण्यात आल्याने ब्राम्हण समाजात काहीशी नाराजी दिसते. तसेच धंगेकर हेही तगडे उमेदवार असून, त्यांनी मोठा जोर लावल्याचे पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या गिरीश बापट यांची भेट घेतली. त्यानंतर बापट हे प्रचारात सहभागी झाले. मात्र, कसब्यात अडचणीत असलेल्या भाजपाने बापट यांना आजारपणातही रिंगणात उतरविल्याबद्दल विरोधी पक्षांकडून टीका होत आहे.
अधिक वाचा : राष्ट्रवादीकडून कोश्यारींचे अधोगती पुस्तक सादर; इतिहासात भोपळा
गिरीश बापट हे प्रचारामध्ये सहभागी होणार नसल्याचे प्रारंभी सांगण्यात आले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नेमक असे काय झाले, असा प्रश्न विचारला जात असताना त्यावर बोलताना काकडे म्हणाले, गिरीश बापटसाहेब 1968 पासून प्रचारामध्ये सहभागी होत आलेले आहेत. घोडा कितीही म्हातारा झाला तरी पळतो. सिंह कितीही म्हातारा झाला, तरी शिकार करतो, मांस खातो. निवडणुका आल्या, की गिरीश बापट साहेब बाहेर पडतात. त्यांच्यावर कोणीही दबाव आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते स्वतः खुशीने प्रचारामध्ये आले आहेत. गिरीश बापट आजारी असतानाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा जोश संचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांना भेटायला जायला आणि ते प्रचारात सहभागी व्हायला म्हणजे झाडावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली, अशी प्रतिक्रियाही काकडे यांनी नोंदविली.








