खेड / राजू चव्हाण :
मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या जगबुडी पुलावरुन कार नदीत कोसळून ६ जणांचा हकनाक बळी गेला असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून कुचकामी उपाययोजनांचा अवलंब सुरू आहे. अपघात रोखण्यासाठी दुर्घटनेनंतर जगबुडी पुलाच्या ‘हॉटस्पॉट’वर उभारलेले गर्डर काही तासातच हटवून तेथे ३ रिकामी पिंप उभी करत खात्याने बेफिरपणाचा कळस केला आहे. यामुळे आणखी बळी हवेत का? असा उद्विग्न सवाल उपस्थित करत राष्ट्रीय महामार्ग खात्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यापासून परशुराम घाटापर्यंत वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळणासह नव्या जगबुडी पुलावरील वळणामुळे अपघाताची मालिका थांबेनाशी झाली आहे. ३ दिवसांपूर्वी घडलेला अपघात ३ वर्षातील मोठा प्राणांतिक अपघात घडल्याने नवा जगबुडी पूल नव्याने चर्चेत आला आहे. दुर्घटनेनंतरही महामार्ग खात्याने तातडीच्या डागडुजीची जराही तसदी न घेता पुन्हा एकदा उदासीनता दाखवून दिली आहे. भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याने काही तासातच अपघातस्थळी ३ गर्डर बसवले. ही मलमपट्टी टीकेची धनी बनताच काही तासातच अपघातस्थळावरुन गर्डर बाजूला हटवत वळणालगत उभे करत अपघातांचा धोका आणखी वाढवण्याची नवी भर घातली आहे. जगबुडी पुलाच्या ‘हॉटस्पॉट’वर चक्क ३ रिकामे पिंप उभे करत केलेली तकलादू उपाययोजना वाहनचालकांसाठी चिंतेची बाब बनली असून त्यांचा जीव टांगणीवर आहे.
- ठोस उपाययोजनांचा अवलंब करणार तरी कधी?
नव्या जगबुडी पुलावर भीषण दुर्घटना घडूनही अजूनही राष्ट्रीय महामार्ग सुस्तच आहे, ही खेदजनकच बाब म्हणावी लागेल. भीषण दुर्घटनेनंतर वाहनचालकांना जीव मुठीत धरुनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागणार तरी कधी अन् राष्ट्रीय महामार्ग खात्याला ठोस उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी सवड मिळणार तरी कधी?, असा सवाल खेडमधील सामाजिक कार्यकर्ते रोहन विचारे यांनी केला आहे








