कारवार काळीनदीवरील दुर्घटना : सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही
कारवार : येथून जवळच्या काळीनदीवरील कोसळलेल्या पुलाचे अवशेष हटविताना जुन्या पुलाचा स्लॅब (कँटिलिवर गर्डर) कोसळल्याची दुर्घटना शुक्रवारी घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. तथापि, पुलाचे अवशेष हटविण्यासाठी वापरण्यात येत असलेला मोठ्या आकाराचा बार्ज थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात आले. जुन्या पूलाचा स्लॅब जुन्या पूलाला समांतर आणि काहीच अंतरावर कोसळला असता तर नक्कीच नव्या पूलाची हानी झाली असती. हटविण्यात येत असलेला स्लॅब कोसळल्याने नव्या पूलावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील काळीनदीवरील सुमारे 1 कि. मी. लांबीचा आणि 40 वर्षे जुना पूल 7 ऑगस्ट 2024 रोजी रात्री अचानकपणे कोसळला होता. पूल रात्री कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. तामिळनाडूचा एक ट्रक काळी नदीत कोसळला होता. ट्रक चालकाला वाचविण्यात यश आले होते. जुना पूल कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. या रस्त्यावरील वाहनांचा ओघ पाहता नव्या पुलाला समांतर आणखी एक पूल होणे गरजेचे होते.
त्यामुळे प्रशासनाने कोसळलेल्या पुलाचे अवशेष हटवून त्याच ठिकाणी आणखी एक पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या चार-पाच महिन्यांपासून कोसळलेल्या पुलाचे अवशेष हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी मुंबई येथील जुने बांधकाम हटविण्याच्या कंपनीकडून क्रेन, बार्ज, वापरुन पुलाचे अवशेष हटविण्यात येत आहेत. शेकडो कामगार अवशेष हटविण्यासाठी कार्यरत आहेत. जुन्या पुलाचा स्लॅब (कँटिलिव्हर गर्डर) हटविताना योग्य तो सपोर्ट नसल्यामुळे पाण्यातील फौंडेशन पिलरपासून विभक्त झाला आणि नदीत कोसळला. कोसळलेला स्लॅब नव्या पुलापेक्षा अधिक उंचीवर उभा ठाकला आहे. जर का उभा ठाकलेला स्लॅब नव्या पुलावर कोसळला असता तर नवीन पुलाला धोका पोहचू शकला असता, असे सांगण्यात आले आहे.
बघ्यांची गर्दी
जुन्या पुलाचा स्लॅब हटविताना गर्डर कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.स्लॅब कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर होताच बघ्यांनी नवीन पूलावर गर्दी केली होती. काळीनदीवरील नव्या पुलावरून काय घडले याबद्दल जाणून घेतले. दरम्यान, हटविण्यात येत असलेल्या स्लॅबवर कामगार काम करीत असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे सांगण्यात आले.









