उजव्या विचारसरणीच्या नेत्या ः देशात नवीन सरकार स्थापन
रोम / वृत्तसंस्था
उजव्या विचारसरणीच्या जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी इटलीच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 45 वर्षीय मेलोनी यांनी इटलीच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शपथ घेतल्यानंतर त्या देशातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकीत त्यांच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाला सर्वाधिक मते मिळाली होती. मेलोनी यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. इटलीमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जॉर्जिया मेलोनी यांनी इतिहास घडवला होता. त्यांनी माजी पंतप्रधान मारियो द्राघी यांचा मोठय़ा फरकाने पराभव केल्यानंतर इटलीमध्ये दुसऱया महायुद्धानंतर उजव्या विचारसरणीच्या सरकारचा मार्गही मोकळा झाला. मेलोनी युतीला सिनेटमध्ये 114 जागा जिंकण्यात यश आले. इटलीमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी सिनेटमध्ये 104 जागांची आवश्यकता होती. युतीमधील इतर पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर जुलैमध्ये इटलीतील मारियो द्राघी यांचे सरकार कोसळले होते.
इटलीमध्ये 1945 नंतर 2022 पर्यंत 77 वर्षात 70 व्यांदा सरकार बदलले आहे. जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान झाल्यानंतर इटलीचा फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीच्या चर्चेलाही जोर आला. वास्तविक, जॉर्जिया मेलोनी स्वतःला मुसोलिनी समर्थक मानतात. जॉर्जिया मेलोनी यांनी निवडणुकीपूर्वी फोर्झा इटालिया आणि द लीग यांच्याशी युती केली. युतीला 43 टक्के मते मिळाली आहेत. जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाला 26 टक्के मते मिळाली. तर डाव्या लोकशाही पक्षाच्या नेतृत्वाखालील युतीला जवळपास 26 टक्के मते मिळाली.









