दर वाढल्याने सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका
बेळगाव : कडधान्य, डाळी, भाजीपाल्याबरोबर आता आले, लसणाच्या दरातदेखील वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गृहिणीच्या स्वयंपाकावर परिणाम झाला आहे. आवक घटल्याने दरवाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात आले 200 ते 250 रुपये तर लसूण 150 ते 200 रुपये किलो दर झाला आहे. मागील पंधरा दिवसात लसणाची आवक कमी झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. मार्च महिन्यापर्यंत आल्याचा दर 80 रुपये किलोपर्यंत होता तो आता 200 ते 250 रुपयांवर पोहोचला आहे. तर 120 रुपये असणाऱ्या लसणाचा दर 200 रुपय; गेला आहे. त्यामुळे फोडणी व खाद्यपदार्थाच्या चवीवर परिणाम झाला आहे.
खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले
गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याचे दर भरमसाट वाढले आहेत. डाळी, कडधान्याचे दरही वाढले आहेत. त्यातच आता दैनंदिन स्वयंपाकात लागणारे आले आणि लसणाच्या किंमती वाढल्याने खरेदीवर परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: मांसाहारी स्वयंपाकासाठी आले आणि लसणाचा अधिक वापर केला जातो. मात्र दर वाढल्याने खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेषत: चटणी आणि इतर खमंग पदार्थ बनविण्यासाठी आले आणि लसणाची फोडणी दिली जाते. मात्र दरात वाढ झाल्याने फोडणीदेखील महागणार आहे. गुजरात, मध्यप्रदेश, हिमाचलप्रदेश येथून लसणाची आवक होते. मात्र सध्या हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी झाल्याने तेथून होणारी आवक थांबली आहे. शिवाय इतर राज्यातूनदेखील लसणाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे लसणाच्या किंमती वाढल्या आहेत. नवीन पीक येईपर्यंत लसणाच्या किंमती तेजीत राहणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.









