आळसंद / संग्राम कदम :
खानापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक ऊस शेतीतून वळण घेत शेतकऱ्यांनी आले शेतीकडे मोर्चा वळवला आहे. आळसंद, बाझर, बलवडी (भा), तांदळगाव, जाधवनगर, कमळापूर, खंबाळे, ढवळेश्वर, कळंबी, भाळवणी, चिंचणी, मंगरुळ, बामणी, कार्वे अशा गावांमध्ये हजारो एकरांवर आले शेती केली जाते. मात्र यंदा अवकाळीमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.
१२ मे पासून तालुक्यात सुरु झालेल्या पावसाने सुरुवातीला समाधानाची भावना निर्माण केली होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे बियाणे लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. अनेक शेतकयांनी २० मे पासून आले बियाणे लावणीसाठी अडी लावून ठेवली होती. मात्र जमीन ओलसर असल्याने व काळी जमीन पाणी निचऱ्यास कमी अनुकूल असल्याने लागवडीस विलंब होत आहे. परिणामी बियाणे कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.
दोन वर्षांत आले शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाल्यामुळे अनेक ऊस उत्पादकांनी आले शेतीकडे बळण्याचा निर्णय घेतला होता आलेसाठी कधी ११० ते १४० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. मात्र यंदा बाजारात आलेचे दर घसरून २२ रुपये प्रतिकिलोपर्यंत आले. तरीही शेतकयांनी यंदा देखील आले बियाणे तयार केले होते. मात्र हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे हिशेब गडबडला आहे.
या भागात प्रशिक्षित मजुरांची टंचाईही जाणवू लागली आहे. पावसामुळे लागवड लांबली असून अचानक कोरडी हवा सुरू झाली तरी तातडीने लागवडीसाठी उपलब्ध होणारे मजूर मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. मजुरांच्या मागणीत बाढ झाल्यास मजुरीचे दर वाढण्याचीही शक्यता आहे. यामुळे शेतीचा आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज अचूक न लागल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. एकीकडे पेरणीचा हंगाम हातातून निसटत चालला आहे, तर दुसरीकडे मेहनतीने साठवलेले बियाणे बाया जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतक्रयांना मदतीचे आश्वासन द्यावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास नुकसानीचा फटका बसण्याची भीती आहे. सध्या पाऊस थांबण्याची प्रतीक्षा असून, वेळेत पेरणी करता आली नाही तर उत्पादनावर परिणाम होणार आहे.
- यावर्षी आले पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार
पाऊस सतत असल्यामुळे खोडवा आले पीकही काढता येईना पावसामुळे व्यापाऱ्यालाही आले काढता येईना आणि दरही मिळेना झाला आहे असाच पाऊस राहिला तर आले बी बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे असे मत आले उत्पादक शेतकरी गुलाब मोरे यांनी व्यक्त केले.
- आले पिकाला हमीभाव द्यावा
आळसंद परिसरात आल्याच्या पिकाच्या लागणीचे प्रमाण वाढले आहे शेतकरीही वेगळे पीक घ्यायचे म्हणून आले पीक शेतीकडे वळला आहे त्यामुळे ऊस व इतर पिकाकडे दुर्लक्ष केले पण आल्याच्या दर निश्चित नसतो यामुळे शेतकरीही चलबिचल होऊ लागला आहे आले पिकाला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
- बियाण्यांची उगवणक्षमता घरगुती पध्दतीने करावी
सध्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे हवामानात बदल झाला असून जमितीन ओलावा बाढला आहे. बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आवश्यक असल्याचा सल्ला कृषि विभागाने दिला आहे. घरगुती पध्दतीने बियाण्यांची उगम चाचणी घेता येते. टक्केवारी ८० पेक्षा जास्त असल्यास बियाणं दर्जेदार मानली जातात. हवामानाचा अंदाज घेऊन पेरणीसाठी तयार रहावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी धनराज राठोड यांनी केले आहे.








