वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय सलामीवीर शुभमन गिलने वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकनात अग्रस्थान गमावले असून त्याच्या जागी पाकच्या बाबर आझमने पुन्हा अग्रस्थान पटकावले आहे. बुधवारी आयसीसीने ताजी मानांकन यादी जाहीर केली.
मागील महिन्यात झालेल्या वर्ल्ड कपवेळी गिलने अग्रस्थानावर झेप घेतली होती. पण त्यानंतर त्याने एकही वनडे सामना खेळलेला नाही. त्यामुळे बाबरला पुन्हा एकदा 824 गुणांसह अग्रस्थान मिळविता आले आहे. 810 गुणांसह गिल दुसऱ्या स्थानावर असून विराट कोहली व रोहित शर्मा त्याच्या पाठोपाठ आहेत. श्रेयस अय्यरची घसरण झाली असून तो आता 12 व्या स्थानावर आहे तर केएल राहुल एका स्थानाची प्रगती करीत 16 वे स्थान मिळविले आहे.
गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराजने अग्रस्थान कायम राखले आहे तर ऑस्ट्रेलियाचा जोश हॅझलवुड दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तिसऱ्या, जसप्रित बुमराह पाचव्या, कुलदीप यावद आठव्या स्थानावर आहेत. शमीने 11 वे तर रवींद्र जडेजाने 22 वे स्थान पटकावले आहे. अष्टपैलूंच्या यादीत फारसा बदल झालेला नाही. बांगलादेशचा शकीब अल हसन पहिल्या, जडेजा 12 व्या, हार्दिक पंड्या 17 व्या स्थानावर आहेत.
टी-20 मानांकनात सूर्यकुमार यादव अग्रस्थानी कायम आहे तर गोलंदाजांत इंग्लंडच्या आदिल रशिदने पहिले स्थान राखले आहे. ग्रीम स्वाननंतर अग्रस्थान मिळविणारा इंग्लंडचा तो पहिला स्पिनर आहे. आदिलने अफगाणच्या रशीद खानची जागा घेतली असून विंडीजविरुद्धच्या चार टी-20 सामन्यात मिळविलेल्या सात बळींच्या कामगिरीचा त्याला यासाठी लाभ झाला आहे. भारताचा रवी बिश्नाई तिसऱ्या स्थानी आहे. अष्टपैलूमध्ये शकीब अग्र्रस्थानी, हार्दिक पंड्या चौथ्या स्थानी आहे.
कसोटी फलंदाजांत न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनने पहिले स्थान, इंग्लंडचा जो रूटने दुसरे, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथने तिसरे स्थान मिळविले आहे. उस्मान ख्वाजाने प्रगती करीत चौथ्या स्थानी झेप घेतलीय तर भारताचा रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे. गोलंदाजांत आर. अश्विन आघाडीवर आहे, त्यानंतर रबाडा, शकीब व जडेजा यांनी क्रम मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कमिन्स तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर लियॉन पाचव्या, स्टार्क आठव्या, हॅझलवुड दहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलूंत जडेजा पहिल्या, अश्विन दुसऱ्या, अक्षर पटेल पाचव्या स्थानावर आहे.









