वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय संघातील सलामीचा फलंदाज शुभमन गिल याला डेंग्यूची बाधा झाल्याने तो रविवारी झालेल्या चेन्नईतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी होणाऱ्या अफगाण विरुद्धच्या सामन्यात गिल उपलब्ध राहणार नसल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
गिलवर सध्या वैद्यकिय उपचार चालू असून त्याचा आणखी काही दिवस मुक्काम चेन्नईमध्येच राहणार आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर औषधोपचार करत असून आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहावे लागेल. भारतीय संघाचा अफगाण बरोबरचा सामना येत्या बुधवारी दिल्लीत होणार असल्याने भारतीय संघ सोमवारी दिल्लीला रवाना झाला. मात्र या संघाबरोबर शुभमन गिल प्रवास करणार नसल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी गिलच्या आणखी काही वैद्यकिय चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर गिल भारतीय संघाबरोबर दिल्लीला प्रयाण करणार असल्याची बातमीही देण्यात आली होती. पण डॉक्टरांनी त्याला आणखी काही कालावधीसाठी चेन्नईतच राहण्याचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात गिलच्या जागी इशान किसनला सलामीच्या गड्यासाठी संधी देण्यात आली होती. या पहिल्या सामन्यात किसन लवकर बाद झाला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघामध्ये अफगाणविरुद्धच्या सामन्यात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. केएल. राहुल आणि विराट कोहली यांची दमदार फलंदाजी तसेच जडेजा, कुलदीप यादव यांच्या दमदार फिरकीसमोर भारताने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा 6 गड्यांनी पराभव करुन विजयी सलामी दिली आहे. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत 24 वर्षीय गिलची फलंदाजी चांगलीच बहरली असून त्याने वनडेमध्ये 5 शतके झळकवली आहेत. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारताला तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा जेतेपद मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गिलचे संघातील आगमणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









