वृत्तसंस्था / दुबई
नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताचा सलामीचा फलंदाज शुभमन गिलने आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी गिलची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. या स्पर्धेत बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या सामन्यात गिलने नाबाद 101 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. तर पाक विरुद्धच्या सामन्यात त्याने 46 धावांचे योगदान दिले होते. या कामगिरीमुळे गिलला आणखी जादा 21 मानांकन गुण मिळाल्याने तो आता फलंदाजांच्या मानांकन यादीत 817 गुणांसह अग्रस्थानावर आहे. या मानांकन यादीत यापूर्वी गिल आणि द्वितीय स्थानावरील पाकचा बाबर आझम यांच्यात 23 मानांकन गुणांचा फरक होता. पण आता हा फरक अधिक वाढला असून उभयत्यांच्या गुणांमध्ये 47 गुणांचा फरक आहे.
पाक विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद शतक झळकविल्याने त्याने वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या पाच खेळाडूमध्ये प्रवेश केला आहे. कोहलीने न्यूझीलंडच्या डॅरील मिचेलला मागे टाकत पाचवे स्थान पटकाविले आहे. भारताचा के. एल. राहुल या ताज्या यादीत 15 व्या स्थानावर आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध नाबाद 41 धावांची खेळी केल्याने त्याचे स्थान दोन अंकांनी वधारले. न्यूझीलंडचे फलंदाज विल यंग आणि टॉम लॅथम यांनी पाक विरुद्ध शतके झळकविल्याने त्यांचे स्थान वधारले आहे. यंग आता 14 व्या तर लॅथम 30 व्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघातील रचिन रविंद्रने बांगलादेश विरुदद्ध शतक झळकविल्याने त्याने या मानांकन यादीत 24 वे स्थान मिळविले आहे. न्यूझीलंडचा ग्लेन फिलीप्स 28 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे अॅलेक्स कॅरे 50 व्या तर जोश इंग्लीस 81 व्या स्थानावर आहे. आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत द. आफ्रिकेच्या केशव महाराज आणि मॅट हेन्री यांनी पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच अॅडम झम्पा दहाव्या स्थानावर आहे.









