वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा सलामीवीर शुभमन गिल व वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या वनडे ताज्या मानांकन यादीत फलंदाजी व गोलंदाजीत पहिले स्थान पटकावले आहे.
गिलने पाकचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली तर सिराजने दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर केशव महाराजला मागे टाकत अग्रस्थान पटकावले. विश्वचषकातील कामगिरीमुळे गिलला पहिले स्थान पटकावता आले. हे स्थान मिळविणारा तो भारताचा एकूण चौथा फलंदाज बनला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांनी वनडे फलंदाजीत नंबर एक स्थान मिळविले होते. गिलने लंकेविरुद्ध 92 तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 23 धावा जमविताना एकूण सहा डावात 219 धावा केल्या आहेत. बाबर आझमने वर्ल्ड कपमधील 8 डावांत 282 धावा जमविल्या असून त्याला सहा रेटिंग गुण गमवावे लागल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दोन वर्षांहून अधिक काळापासून बाबर अग्रस्थानावर राहिला होता.
अन्य भारतीय फलंदाजांत विराट कोहलीने विश्वचषकातील शानदार कामगिरीमुळे चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे तर कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे. कोहलीने या वर्ल्ड कपमध्ये आठ डावांत सर्वाधिक 543 धावा 108.60 च्या सरासरीने बनविल्या असून त्यात 2 शतके चार अर्धशतकांचा समावेश आहे. द.आफ्रिकेचा क्विन्टन डी कॉक तिसऱ्या स्थानावर आहे. मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने 17 स्थानांची प्रगती केली असून तो आता 18 व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकचा सलामीवीर फखर झमान (तीन स्थानांची प्रगती करीत 11 वे), अफगाणचा सलामीवीर इब्राहिम झद्रन (6 स्थानांची प्रगती करीत 12 वे) यांनीही मानांकनात बढती मिळविली आहे.
गोलंदाजांमध्ये भारताच्या सिराजने वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करीत मानांकनात टॉपवर पोहोचला आहे. त्याने आतापर्यंत 8 सामन्यात 10 बळी टिपले असून त्याने केशव महाराजला मागे टाकले आहे. अन्य भारतीय गोलंदाजांत जसप्रित बुमराहने तीन स्थानांची प्रगती करीत आठवे स्थान घेतले तर शमीने सात स्थानांची झेप घेत दहावे स्थान मिळविले आहे. डावखुरा स्पिनर कुलदीप यादवनेही तीन स्थानांची बढती मिळवित चौथे स्थान घेतले तर रवींद्र जडेजा आठ स्थानांची झेप घेत 19 वे स्थान मिळविले आहे.
बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन अष्टपैलूंच्या मानांकनात अग्रस्थानी असून भारताचा जडेजा 10 व्या स्थानावर आहे. जडेजाने या स्पर्धेत 8 डावांत 14 बळी टिपलेत तर फलंदाजीत त्याने चार डावात 55.50 च्या सरासरीने 111 धावा जमविल्या आहेत. दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडलेल्या हार्दिक पंड्याची मात्र 13 व्या स्थानावर घसरण झाली आहे.









