शहरातील लक्ष्मी मार्ग परिसरात गजबजल्या भाजी मंडईत हमालीचे काम करणाऱ्या व्यक्तीस मारहाण केल्याचा प्रकार आज घडला. त्यात हमाल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारादाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. संतोष शंकर पोवार ( वय ५० रा. गिजवणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रफिक मुल्ला, अमर नेवडे (दोघे रा. गडहिंग्लज) यांच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, मयत संतोष पोवार हा भाजी मंडईत हमालीचे काम करत होता. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास रफिक मुल्ला, अमर निवडे या दोघांनी मिळून संतोष यांना मारहाण केली होती. या मारहाणीत संतोष हे डांबरी रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याच्या आतील बाजूस रक्तस्राव होऊन ते गंभीर जखमी झाले होते. काही वेळानंतर स्थानिकांना संतोष पोवार पडल्याचे दिसल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून कोल्हापूर येथिल सीपीआर येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे संतोष यांचा मृत्यू झाला. मयताचा मुलगा रोहित पोवार (रा. गिजवणे ) यांनी आपल्या वडिलांच्या खूनाची फिर्याद दिली आहे.