दिव्यांग, गोरगरीब जलतरणपटूंना लाभ
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या होतकरू गोरगरीब व दिव्यांग जलतरणपटूंना जयभारत फौंडेशनतर्फे प्रवासासाठी टाटा विंगर गाडीची मदत करण्यात आली आहे.
स्विमर्स व ऍक्वेरिअस क्लबतर्फे गेली 22 वर्षे खेडोपाडय़ातील गोरगरीब दिव्यांग जलतरणपटूंना या सरावासाठी ये-जा करणे मोठे आव्हान होते. प्रवास करताना अनेक अडथळे निर्माण होत होते.
याची दखल घेऊन जयभारत फौंडेशन, अशोक आयर्न ग्रुपतर्फे या खेळाडूंना ये-जा करण्यासाठी टाटा विंगर गाडीची मदत करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व इतर भागातील दिव्यांग गोरगरीब होतकरू आणि विशेष मुलांच्या जलतरणाशी संबंधितांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन जयभारत फौंडेशनने हा निर्णय घेतला.
या कार्यक्रमाला जयभारत फौंडेशनचे पदाधिकारी जयंत हुंबरवाडी, लता कित्तूर, माकी कपाडिया, जी. एस. बेलकेरी, उमेश कलघटगी, सुधीर कुसाने, लक्ष्मण कुंभार, इंद्रजित हलगेकर, राणी चन्नम्माचे जगदीश गस्ती व अनेक जलतरण प्रशिक्षक व खेळाडू, पालकवर्ग यांच्या उपस्थितीत टाटा विंगर सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे पुढील सरावावेळी या सर्व खेळाडूंना टाटा विंगरचा उपयोग होणार आहे.









