बेळगाव लोककल्प फाऊंडेशनकडून मदत सुपूर्द
वार्ताहर /कणकुंबी
शिक्षण खात्यामार्फत घेण्यात येणाऱ्या विभागीय पातळीवरील जांबोटी विभागाच्या माध्यमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धा कणकुंबीमध्ये होणार असून यावेळी जांबोटी विभागातील आठ माध्यमिक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सदर क्रीडा स्पर्धांसाठी लागणारे क्रीडा साहित्य बेळगावच्या लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने देण्यात आले आहे. लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाऊंडेशन यांच्यावतीने कणकुंबी भागातील 32 गावे दत्तक घेण्यात आलेली असून संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील गोरगरीब नागरिकांना रोजगार उपलब्ध करून लोकांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आरोग्य शिबिर व इतर उपयुक्त उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्य व क्रीडा साहित्य देऊन शैक्षणिकदृष्ट्या सहकार्य केले जात आहे. त्याच अनुषंगाने कणकुंबीमध्ये होणाऱ्या विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धासाठी आज लोककल्पचे संस्थापक किरण ठाकुर, संचालक अजित गरगट्टी, पॅप्टन नितीन धोंड, किरण गावडे, प्रीतम बिजलानी व लोककल्पच्या मॅनेजर मालिनी बाली यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्पचे कार्यकर्ते सुरजसिंग रजपूत, संतोष कदम, अनंत गावडे, सौ. सुहासिनी पेडणेकर व परशुराम गावडे यांनी कणकुंबी श्री माउली विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांच्याकडे सर्व क्रीडा साहित्य सुपूर्द केले.
या क्रीडा साहित्यामध्ये व्हॉलीबॉल दोन, थ्रोबॉल दोन, भाले चार, क्रिकेट किट, चेस बोर्ड चार, स्टॉप वॉच, रिले बॅटन, स्किपिंग रोप सहा, थाळी चार, व्हॉलीबॉल नेट, थ्रोबॉल नेट, हॅन्डबॉल असे क्रीडा साहित्य देण्यात आले आहे. यावेळी मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी लोककल्पच्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल आणि सहकार्याबद्दल अभिनंदन करून क्रीडा साहित्य दिल्याबद्दल लोककल्पचे संस्थापक किरण ठाकुर व त्यांचे संचालक मंडळ आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले.









